Breaking News

जनतेला नव्हे, तर मोदींना ‘अच्छे दिन’! अजित सिंह यांची टीका; उत्तर प्रदेशात 25 वर्षानंतर एकत्रित सभालखनऊ - उत्तर प्रदेशमध्ये सप-बसप आणि राष्ट्रीय लोकजनता दल (आरएलडी) हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. देवबंद येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना आरएलडी प्रमुख अजित सिंह यांनी सामान्य माणसाला 15 लाख केव्हा मिळणार, असा सवाल केला. शिवाय, सामान्य जनतेऐवजी मोदी यांना ‘अच्छे दिन’ आल्याची टीका केली.

मोदी यांच्याविरोधात आता विरोधी पक्षांनी एकत्र येत जोरदार प्रचार करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावर देखील आता भाजपविरोधक एकत्र आले आहेत. भाजपने पाच वर्षापूर्वी दिलेल्या आश्‍वासनांची त्यांना आठवण करून दिली जात आहे. त्याआधारे मोदी आणि भाजपला लक्ष्य केले जात आहे. देशातील भाजप विरोधक आता आक्रमक झाले आहेत. त्यांनी मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. दिल्लीतदेखील काँग्रेस-‘आप एकत्र’ येण्याला गती येत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला आव्हान दिले आहे.
पंतप्रधानपदासाठी उत्तर प्रदेशचे महत्त्व सर्वज्ञात आहे; पण, 2014 प्रमाणे भाजपला उत्तर प्रदेशमध्ये यश मिळेल का? ही शंका आहे. शिवाय, सप-बसप आणि आरएलडी एकत्र आल्याने मतांच्या विभाजनाचा नेमका फायदा कुणाला होणार, यावर देखील सर्व राजकीय गणिते अवलंबून आहेत. या पार्श्‍वभूमीवर सप-बसपची 25वर्षांनंतर पहिली एकत्रित सभा झाली. त्यात मायावती यांनी थेट मुस्लिम मतदारांना काँग्रेसला मतदान करून मत वाया घालवू नका, असे आवाहन केले.