Breaking News

चिखली घाटात एस.एस.टी पथकाकडून 6 लाख जप्त


कोळगाव/प्रतिनिधी
श्रीगोंदे तालुक्यातील चिखली घाटात निवडणूक एसएसटी पथक क्रमांक 5 चे प्रमुख डी.बी डफळ यांच्या पथकाने सुमारे 6 लाख रुपये स्विफ्ट गाडीतून घेऊन जात असताना पकडले. त्याचा पंचनामा करून पकडलेली रक्कम अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कोषागारात जमा करण्यात आली आहे. अशी माहिती पथक प्रमुख डफळ यांनी दिली.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या लोकसभा निवडणुक चालू असल्याने निवडणुक आयोगाने आर्थिक परिस्थितीवर करडी नजर ठेवली आहे. निवडणूक आयोगाने प्रत्येक तालुक्यात ठिकठिकाणी चेक पोस्ट तयार केले आहेत. दरम्यान काल दि.6 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास नगरकडून काष्टीकडे जाणारी स्विफ्ट क्रमांक के ए-23 एम 8375 ही चिखली घाटात चेकपोस्टवर चेक केली असता या गाडीमध्ये रोख रक्कम 5 लाख 98 हजार 500 रुपये आढळून आले. या बाबत पथक प्रमुख डी.बी. डफळ यांनी गाडीमधील पांडुरंग अण्णा नरळे रा.पानवन, ता.मान जि.सातारा यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही जेसीबी घेण्यासाठी नगर येथे गेलो होतो. पण आमचा व्यवहार झाला नाही. म्हणून आम्ही परत राशीन येथे दुसरे जेसीबी पाहण्यासाठी चाललो आहोत. पण जवळील रक्कमे बाबत पुरावे देऊ शकले नाहीत.

त्यामळे पकडलेली रक्कम एस. एस. टी. क्रमांक 5 या पथकाने जप्त केली असून त्याचा पंचनामा करून पकडलेली रक्कम अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कोषागारात जमा करण्यास पाठविण्यात आली आहे. या बाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर पाठविण्यात आला असल्याचे डफळ यांनी सांगितले. या कारवाईत पथक प्रमुख डी.बी डफळ, पो.नाईक एस.यु.गोमसाळे, पो.नाईक एन.एम.पठारे, पो.कॉ. व्ही.बी.गांगर्डे यांनी कामगिरी केली.