Breaking News

राजकारणातून निवृत्तीचे वय साठ हवे; राहुल गांधी यांचे मत; 72 हजारांसाठी प्राप्तिकर न वाढवण्याची हमीपुणे / प्रतिनिधीः
वयाच्या 60 व्या वर्षी राजकारणातून निवृत्त झाले पाहिजे असे मत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले. गरिबी निर्मूलनासाठी दरवर्षी जे 72 हजार रुपये देण्यात येणार आहेत, त्यासाठी प्राप्तिकर वाढविणार नाही, अशी ग्वाही त्यांनी अन्य एका प्रश्‍नाला उत्तर देताना दिली. 

हडपसरच्या मगरपट्टा सिटी येथे राहुल यांनी तरुणांशी संवाद साधला. मराठी अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का यांनी राहुल यांची मुलाखत घेतली. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, आमदार विश्‍वजीत कदम आदी नेते उपस्थित होते. राहुल यांनी महाविद्यालयांतील पाच हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अनेक प्रश्‍नांची दिलखुलास उत्तरे दिली. या वेळी राहुल यांना राजकारणात निवृत्ती असली पाहिजे का? असा प्रश्‍न विचारला असता त्यांनी साठ वर्षे हे निवृत्तीचे वय असले पाहिजे, असे सांगितले. सुबोध भावे यांनी जेव्हा संवाद साधण्यास खूप हिंमत लागते, असे विचारले असता त्यांनी अनुभवातून हिंमत आली. जे सत्य आहे ते स्वीकारले. सत्यातून हिंमत येते. जर खोटे स्वीकारले, तर भीती निर्माण होते. सत्य कडवे असते; पण ते स्वीकारावं लागतं, असे उत्तर दिले. 

आम्ही अनेकांशी संवाद साधून त्याचे म्हणणे जाणून घेतले आणि त्यानंतर जाहीरनामा तयार केला. 72 हजारांची कल्पनाही मला लोकांशी बोलल्यानंतर सुचली, अशी माहिती राहुल यांनी दिली. जे शक्य आहे, तेच मी बोलतो. मला उगाच हवेत बोलायला आवडत नाही असे त्यांनी म्हटले. रोजगाराच्या प्रश्‍नावर बोलताना भारत रोज 24 हजार नोकर्‍या गमावत आहे. आपल्या देशात कौशल्याचा आदर केला जात नाही, अशी खंत राहुल यांनी व्यक्त केली. ‘तुम्ही 72 हजार रुपये कसे उभारणार असे विचारले असता तुम्ही नीरव मोदी, विजय मल्ल्या यांच्याबद्दल ऐकले आहे का, अशी उलट विचारणा राहुल यांनी केली. एअर स्ट्राइकसंबंधी बोलताना त्याचे सर्व श्रेय हवाई दलाचे आहे. एअर स्ट्राइकचे राजकारण करण्याच्या विरोधात मी आहे. मला त्याचे राजकारण करायचे नाही. पंतप्रधान जेव्हा अशा गोष्टींचे राजकारण करतात, तेव्हा मला वाईट वाटते असे ते म्हणाले. ज्याप्रमाणे मी संवाद साधतो, त्याप्रमाणे मोदी संवाद का साधत नाहीत, असा प्रश्‍नही या वेळी राहुल यांनी विचारला. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात जितकी गुतंवणूक केली पाहिजे, तितकी सरकार करताना दिसत नाही, आम्ही सत्तेत आल्यास ते करू, असे आश्‍वासन त्यांनी दिले. 

भारतात प्रत्येक दिवशी तरुण 27 हजार नोकर्‍या गमावत आहे. आपल्या देशात कौशल्याचा आदर केला जात नाही. महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी एक तृतीयांश महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत प्रतिनिधित्व देऊ, असे राहुल यांनी जाहीर केले.


मोदी मोदींच्या घोषणा
माझं नरेंद्र मोदी यांच्यावर प्रचंड प्रेम आहे, माझा त्यांच्यावर अजिबात राग नाही; पण त्यांचा माझ्यावर राग आहे असे राहुल यांनी म्हणताच हॉलमध्ये मोदी यांच्या नावे घोषणाबाजी करण्यात आली. देशातील केवळ 15 व्यक्तींकडे 3 लाख 50 हजार कोटी इतकी संपत्ती आहे. देशातील इतरांकडे संपत्तीचे प्रमाण खूपच कमी आहे. संपत्तीच्या या असमतोल वितरणामुळे देशात गरिबी वाढली आहे, असे ते म्हणाले. 
देशातील मूलभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणूक घटली


प्रियंका माझी बेस्ट फ्रेंड
राहुल गांधी आपली बहिणी प्रियंका वधेरा याच्यासोबत असलेल्या आपल्या नात्याविषयी बोलताना म्हणाले, की आमचे नाते आतूट आहे. माझी आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर ती माझ्यासोबत होती. आम्ही एकत्र वाढलो. काहीवेळा एकमेकांसाठी माघार घेतली. तिने बांधलेली राखी मी तुटल्याशिवाय काढत नाही. लहानपणी आम्ही भांडायचो; पण आता नाही भांडत. ती मला गोड खाऊ घालून लठ्ठ करण्याचा प्रयत्न करते, असे त्यांनी हसत हसत सांगितले.

राहुल गांधीवर बायोपिक
या वेळी सुबोध भावे यांनी राहुल गांधी यांच्यावर बायोपिक करणार असल्याची घोषणा केली. पुढे ते म्हणाले की, मी अभिनेता आहे. आजवर अनेक बायोपिक मी केले आहेत. मला अनेकदा लोक सांगतात, की तू राहुल गांधींसारखा दिसतो. त्यामुळे माझा पुढचा बायोपिक राहुल गांधी यांच्यावर असेल.