Breaking News

सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार

Image result for पाऊस

भारतीय हवामान खात्याचा अंदाज; बळीराजाला दिलासा
मुंबई / प्रतिनिधीः वाढत्या उन्हाळ्यामुळे जिवाची काहिली होत असतानाच भारतीय हवामान खात्याने आज शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. या वर्षातला हा पहिला अंदाज असून पुढच्या महिन्याच्या अखेरीस येणारा अंदाज अधिक अचूक असण्याची शक्यता आहे.
मॉन्सूनचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याने तो नेमका कसा असेल, याविषयी सर्व क्षेत्रात उत्सुकता असते़. सध्या निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने निवडणूक आयोगाने दिलेल्या परवानगीनंतर आज दुपारी मॉन्सूनचा अंदाज जाहीर करण्यात आला. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीएवढाच पाऊस पडेल. यंदा मॉन्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव असला तरी नंतर तो क्षीण होईल. तसेच अखेरीपर्यंत मॉन्सून आपली सरासरी गाठेल. सरासरीच्या 96 टक्के पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खातयाने वर्तवला आहे. यंदा ‘एल निनो’चा प्रभाव असल्याने त्याचा भारतीय मॉन्सूनवर विपरित परिणाम होणार असल्याचा अंदाज अमेरिकन हवामान संस्था, ऑस्ट्रेलियन संस्था तसेच ‘स्कायमेट’ ने व्यक्त केला होता. ‘स्कायमेट’ने यंदा सरासरीच्या 93 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे आता भारतीय हवामान खाते मॉन्सूनबाबत नेमका काय अंदाज वर्तवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
गेल्या वर्षी भारतीय हवामान विभाग व ‘स्कायमेट’ने 97 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता;़ मात्र 2018 मध्ये सरासरीच्या 91 टक्के पाऊस होऊन देशाच्या अनेक भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे यंदा पाऊस कसा असणार याविषयी उत्सुकता वाढली आहे.