Breaking News

महाराष्ट्रातील दहा मतदारसंघातला प्रचार समाप्त; उद्या मतदान; देशात 97 मतदारसंघात निवडणूकमुंबई / प्रतिनिधीः लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील 97 मतदार संघातील प्रचार संपला. त्यात महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांचा समावेश आहे.

विदर्भ, मराठवाडयातील सर्व मतदारसंघातला आणि सोलापुरातला प्रचार आता संपला आहे. गुरूवारी म्हणजेच 18 तारखेला दहा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. देशभरातील 13 राज्यांमध्ये एकूण 97 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे.


लोकसभेच्या दुसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रात काही प्रमुख लढती होणार आहेत. दुसरा टप्पा महाराष्ट्रात चांगलाच गाजणार आहे. या प्रमुख लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे फक्त त्या मतदार संघाचेच नव्हे, तर देशाचे लक्ष लागले आहे. सोलपुरात तिहेरी लढत होत आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे काँग्रेसकडून पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्‍वर स्वामी तर वंचित आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. सोलपुरातील या तिहेरी सामन्यात जनता कोणाला कौल देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अकोल्यात भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रेंना पुन्हा तिकीट दिले आहे, तर काँग्रेसने हिदायत पटेल यांना दुसर्‍यांदा उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे ही इथून लढत आहेत. अमरावतीत नवनीत राणा त्यांच्या ‘युवा स्वाभिमान पक्षा’कडून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या असल्या तरी त्यांना महाआघाडीचा पाठिंबा आहे. राणा यांची लढत शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्यांशी आहे.
नांदेड हा अशोक चव्हाणांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. नांदेडमधून चव्हाण काँग्रेसकडून मैदानात उतरले आहेत. शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी त्यांचा सामना आहे. चव्हाण यांना काँग्रेसचा गड राखण्याचे आव्हान आहे. उस्मानाबादेतून शिवसेनेने ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिले आहे. राष्ट्रवादीकडून माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आणि आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकमेकांचे वैरी मानल्या जाणार्‍या दोन भावांमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे. बीडचा गड भाजपसाठी सोपा मानला जातो. मुंडे यांच्या निधनानंतर 2014 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या डॉ. प्रीतम मुंडे निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीने बजरंग सोनावणे यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत बीडच्या गडात मोठे आव्हान आहे. बीडचा गड कोण जिंकणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
बुलडाण्यातून शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव रिंगणात आहेत, तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे रिंगणात आहेत. परभणीतूनही शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे राजेश विटेकर मैदानात उतरले आहेत. लातूरमध्ये भाजपने विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचा पत्ता कट करत सुधाकरराव शिंगारे यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसने मच्छिंद्र कामंत यांना उमेदवारी दिली आहे. हिंगोलीत काँग्रेसने सुभाष वानखेडेंना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने हेमंत पाटील यांना तिकीट दिले आहे. दोन नवख्या उमेदवारातील या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, तामीळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, पुदुच्चेरी या राज्यांमध्ये मतदान होणार आहे.