Breaking News

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता; गुप्तचर यंत्रणेचा इशारा


श्रीनगर : दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला. जैशचे दहशतवादी 5 ते 9 एप्रिल दरम्यान राज्यात दहशतवादी कृत्य घडवून आणू शकतात. यासाठी या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मदत मिळत आहे. लोकसभा निवडणूक 2019 च्या पार्श्‍वभूमीवर गुप्तचर यंत्रणेचा हा संदेश अतिशय महत्त्वाचा मानत सेना आणि सुरक्षा दलांना अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला. तसेच काश्मीरमध्ये निमलष्करी दलाचे 800 अतिरिक्त जवान पाठवण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला.

गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार, पाकिस्तान लोकसभा निवडणूक 2019 दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये शांतता भंग करण्यासाठी संधी शोधत आहे. भारतात हल्ले करण्यासाठी लष्करे तय्यबा, जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनांप्रमाणेच पाकिस्तानची गुप्तचर संघटना असलेल्या आयएसआयने तीन पथके तयार केली आहेत. त्यातील दहशतवाद्यांना मतदान केंद्रे आणि उमेदवारांना लक्ष्य करण्यास सांगण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांना स्फोटके हाताळण्याचे देखील प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मात्र, प्रत्येक मतदान केंद्र आणि उमेदवाराला संरक्षण देणे ही खरोखरच अत्यंत कसोटीची जबाबदारी असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने माध्यमांना सांगितले आहे. त्यासोबत लोकसभा निवडणुकीनंतर जर विधानसभेची निवडणूक झाली तर, आणखी 11 हजार मतदान केंद्रांना आणि 900 उमेदवारांना संरक्षण द्यावे लागेल.

काश्मीर खोर्‍यातील शांती भंग करण्यासाठी ‘आयएसआय’ स्फोटकांचा वापर करण्यासाठी अफगानिस्तानात प्रशिक्षण घेणार्‍या दहशतवादयांना खतपाणी घालत आहे. दरम्यान, पाकिस्तान लष्करानं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले. दिगवार आणि करमाडा सेक्टरमध्ये गोळीबार केला. त्यात दोन जण जखमी झाले आहेत. कमाल दीन आणि नसीम अख्तर अशी जखमींची नावं आहेत. जखमींवर पुंछमधल्या राजा सुखदेव सिंह रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. प्रशासनाकडून जखमींची विचारपूस करण्यात येत आहे.