Breaking News

ऊर्मिलासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांचे अश्‍लील नृत्यबोरिवलीतील प्रकार; काँग्रेसच्या प्रचारफेरीत ‘मोदी मोदी’च्या जयघोष
मुंबई / प्रतिनिधीः उत्तर मुंबई मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्यासमोर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी अश्‍लिल नाच केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. हुल्लडबाजी करणार्‍या या कार्यकर्त्यांविरोधात ऊर्मिला यांनी बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्या जीवाला धोका असून पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
ऊर्मिला या आज सकाळी काही काँग्रेस कार्यकर्त्यांसह बोरिवली रेल्वे स्थानकाच्या परिसरात प्रचार करत होत्या. त्याचवेळी भाजपचे काही कार्यकर्तेही तिथे आले. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर घोषणाबाजी सुरू झाली. या वेळी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी ऊर्मिला यांच्याकडें पाहून अश्‍लिल हावभाव केले. वेडावाकडा नाच केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या काही कार्यकर्त्यांना चोपही दिला. त्यावेळी झालेल्या झटापटीत एका प्रवासी महिलेला धक्का लागून ती पडली व किरकोळ जखमी झाली. या घटनेनंतर ऊर्मिला यांनी भाजपच्या विरोधात बोरिवली पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार केली.
ऊर्मिला मातोंडकर यांनी या संपूर्ण प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये भीती पसरवण्यासाठी हे सगळे केले जात आहे. ही केवळ सुरुवात आहे. पुढील काळात गोष्टी हाताबाहेर जाऊ शकतात. माझ्या जीवाला धोका आहे. आजच्या प्रकाराविरोधात मी तक्रार दाखल केली असून पोलिस संरक्षणाचीही मागणी केली आहे,’ असे ऊर्मिला यांनी सांगितले.
उत्तर मुंबई मतदारसंघात ऊर्मिला मातोंडकर पूर्ण ताकदीनिशी प्रचार करत असल्याने ही लढत रंगतदार झाली आहे. महिला व तरुणांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऊर्मिला यांच्या प्रचाराच्या धडाक्यामुळे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे.