Breaking News

भगवंताच्या नामचिंतनाने जीवनाला धन्य बनवा-भास्करगिरी महाराज


नेवासे/प्रतिनिधी: तालुक्यातील खेडले काजळी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली. भगवंताच्या नामचिंतनाने व संतसंगतीच्या माध्यमातून जीवनाला धन्य बनवा असे आवाहन श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी यावेळी बोलताना केले.

यावेळी झालेल्या पारायण सोहळ्यात व अखंड हरिनाम सप्ताहामध्ये काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. दुपारच्या सत्रात यावेळेत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील रामायण कथाकार हभप माऊली महाराज मुंडे यांची रामायण कथा झाली. या कथेला देखील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली. काल्याच्या कीर्तनात त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललिलांचे वर्णन केले. यावेळी हभप राजेंद्र महाराज आसने, हभप विठ्ठल महाराज ढगे, हभप लिपणे महाराज, मृदुंगाचार्य दादासाहेब कोरडे, सरपंच बाळासाहेब कोरडे, रायभान कोरडे, सुदाम कोरडे, पोपट मुठे, गोरख ढगे, संतोष कोरडे, संपत पाठे, नारायण गायकवाड, बजरंग उदे, दिनकर उदे यांनी पारायण सोहळा यशस्वी होण्यासाठी योगदान दिले. यावेळी गंगाधर कोरडे, पुंजा हरी कोरडे, आसाराम ढगे, गिन्यणदेव ढगे यांच्यावतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.