Breaking News

झोपडपट्टी विकासाचा शब्द देणाराच नाशिकचा खासदारः आरपीआयच्या बंडखोर गटाचा इशारा


नाशिक/प्रतिनिधी
शहराच्या सर्व दैनंदिन गरजा पुर्ण करणारा माणूस झोपडपट्टीत राहतो.कुठल्याही मुलभूत सुविधांशिवाय जगणार्या या सर्वात शेवटच्या माणसाला त्याच्या दैनंदिन गरजा पुर्ण होतील.एव्हढही कुठल्याच राजकीय पक्षाने झोपडपट्टीवासियांच्या पदरात टाकले नाही.केवळ निवडणूक काळात हजार पाचशेचा तुकडा फेकून मतदान मिळविता येते या गृहीतकांवर झोपडपट्टीतल्या माणसाला वापरून बाजूला फेकले जाते.असा घणाघात करून आरपीआय आठवले गटाचे महानगर प्रमुख पवन क्षिरसागर यांनी झोपडपट्टीचा विकास करण्याचा शब्द लेखी देणार्या उमेदवाराला पाठींबा देण्याचा इशारा दिला आहे.पवन क्षीरसागर यांच्या या भुमिकेमुळे आरपीआयमध्ये युती धर्माला छेद देण्याची खेळी सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.

शनीवारी पाडव्याच्या संध्येला आरपीआयचे महानगरप्रमुख पवन क्षीरसागर यांनी बोलावलेल्या पञकार परिषदेत शहर जिल्हा आरपीआयच्या एकूण हवालदिल मानसिकतेचे पारायण केले.बैलगाडा ओढण्यासाठी किमान बैलांच्या दोन खांद्यांची गरज असते,हे वास्तव नाकारून केंद्रीय आणि जिल्हा नेतृत्वाने वन मॕन आर्मी संकल्पना राबवून एकच खांदा वापरून हा बलाढ्य गाडा ओढण्याचा द्रविडी प्राणायम सुरू ठेवल्याने पक्षाची सर्वदूर अवहेलना होत आहे.केडरबेस कार्यकर्त्याला युज अॕन्ड थ्रोची भुमिका लक्षात आल्याने तो पक्षप्रवाहातून बाहेर जात आहे.राजकारणातील सत्तास्थानांवर नेत्यांनाच अवमानात्मक वागणूक मिळत आहे.नेत्यांची ही परिस्थिती असतांना कार्यकत्याची अवस्था काय आसेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही अशी खंत व्यक्त केल्यानंतर त्यांनी झोपडपट्टी धारकांच्या फसवणूकीचा मुद्दा ऐरणीवर आणला.

निवडणूक काळात सर्वच राजकीय पक्ष झोपडपट्टीत राहणार्या माणसाला गृहीत धरून त्याच्या बहुमोल मताची किंमत ठरवून त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात.यावेळी आम्ही सामान्य माणसाचे मताचा व्यवहार होऊ देणार नाही.त्यासाठी झोपडपट्टी पुर्नविकास कृती समिती स्थापन झाली असून या माध्यमातून प्रबोधन करणार आहोत.जो उमेदवार झोपडपट्टींचे पुर्ण निर्मूलन करून झोपडपट्टीत राहणार्या शेवटच्या माणसाला हक्काचा निवारा देऊन मुलभूत सुविधा देण्याचे लेखी आश्वासन देईल त्यालाच मत देण्याइतपत मतपरिवर्तन करणार असल्याचे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
शहर स्मार्ट बनण्याची प्रक्रीया कासव गतीने वेग घेत आहे.तथापी या प्रक्रीयेतही झोपडपट्यांना त्यांचा हक्क प्रदान झालेला नाही.झोपडपट्यांंचा विकास झाल्याशिवाय किंवा त्याला मुलभूत सुविधा दिल्याशिवाय हे शहर स्मार्ट बनणार नाही.ही गोष्ट दुर्लक्षित होत आहे.केवळ झोपड्या हटवून हा प्रश्न मार्गी लावता येणार नाही.झोपडीत राहणारा माणूस या शहराची प्रत्येक गरज पुर्ण करणारा मुख्य घटक आहे.तो उध्वस्त करून शहर जगू शकत नाही.म्हणून जो उमेदवार या घटकाच्या विकासाला न्याय देईल त्यालाच हे मतदान मिळेल अन्यथा झोपडपट्टी वासिय सामुहीक बहिष्कार टाकतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.त्यांच्या सोबत दिपक डोकेही उपस्थित होते.


युती धर्मावर संकटः
पवन क्षीरसागर हे आरपीआय अ गटाचे महानगर प्रमुख असून जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचे पट्टशिष्य म्हणून आंबेडकर चळवळीत परिचीत आहेत.महाराष्ट्रातील आठवले गट भाजपसेनेचा मिञपक्ष असून लोकसभा निवडणूकीतही युतीचा घटक म्हणून काम करीत आहे.या पार्श्वभूमीवर नाशिकच्या महानगर प्रमुखांनी बंडाचा झेंडा कुणाच्या इशार्यावर हाती घेतला? असा सवाल उपस्थित झाला आहे.पञकार परिषदेनंतर महानगर प्रमुखाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी युती धर्माला तडा देण्याची प्रक्रीया या निमित्ताने नाशिकच्या क्रांती भुमीतून सुरू झाल्याची चर्चा कोण थांबविणार?