Breaking News

अस्वलाच्या हल्ल्यात वृध्द माजी सैनिक जखमी
 परळी / वार्ताहर : जळकेवाडी (ता. सातारा) येथील माजी सैनिक धोंडिबा गंगाराम शिंदे, वय 82 या वयोवृद्ध माजी सैनिकावर शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाणवठ्या (झरा) शेजारील उंबराच्या झाडाखाली अचानक अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाशेजारी सातारा जावली तालुक्यातील जळकेवाडी, जुंगटी धावली, तांबी, पाली, अलवडी, भांबवली केळवली, दत्तवाडी, वारस, गणेशवाडी, सांडवली, कात्रेवाडी, कारगाव, पिसाडी, अंबवडे आदी गावे वास्तव्य करत असून या गाव परिसरात वन्यप्राण्यांचा धुमाकुळ सुरु आहे. गेल्या दोन ते तीन वषार्ंत अस्वलांने सहा ते सात जणांना गंभीर जखमी केल्याने शेतकर्‍यांमध्ये भिती पसरली असून सर्वच गावकरी दहशतीखाली वावरत आहेत.
यासंदर्भात वन विभागाने मात्र आजअखेर कोणत्याही उपाययोजना न केल्याने वन्यप्राण्यांचे शेतकर्‍यांवर हल्ले करणे व शेतीचे नुकसान करण्याचे सत्र सुरुच आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात या परिसरात वन्यप्राण्यांच्या हल्यात जखमी झालेल्या एकालाही अर्थिक नुकसान भरपाई दिली नसून वन्यप्राण्यांचा बदोबस्त सुध्दा केला जात नसल्याने जनतेमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
जळकेवाडी येथील धोंडिबा गंगाराम शिंदे हे शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गोठयातील गाईला पाणी पाजण्यासाठी गावाशेजारील पाणवठ्यावर घेवून गेले होते. गाई झर्‍यावर पाणी पिऊन शेजारील झुडपात उंबराच्या झाडाखाली उंबरे खाण्यासाठी गेली. तिला आणण्यासाठी धोंडिबा शिंदे उंबराच्या झाडाखाली गेले असता त्या झाडाखाली दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डाव्या हाताला तीन ठिकाणी चावा घेतला असून डोक्यालाही मार लागला आहे. त्यांनी व त्यांच्या गाईने त्यांची अस्वलापासून कशीबसी सुटका करून घेतली. ते आरडाओरडा करत कसेबसे रक्तबांबळ अवस्थेत घरी परतत असताना ग्रामस्थांनी धाव घेतली असता, ते गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले. घरात येताच ते बेशुध्द पडले. ग्रामस्थांनी त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सातारा येथील शासकीय जिल्हा रूग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती अद्याप गंभीर आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये काही गावे व त्याच्या शेजारी काही गावे वास्तव्य करत असून या गावांच्या चोहोबाजुला घनदाट जंगल आहे. या जंगलातील वन्यप्राणी दिवसाढवळ्या शेतीत व गाव परिसरात घुसखोरी करीत असनू गावकर्‍यांना त्यांच्यापासून उपद्रव वाढला आहे. गावे मुख्य प्रवाहात येण्यासाठी एकमेंकांना जोडण्यासाठी अद्याप दळणवळणाची सोय म्हणून रस्ते जोडले नसल्याने स्थानिकांना जंगलातूनच पाऊल वाटेने एकदुसर्‍या गावात जावे लागते. त्यातच वारंवार वन्यप्राण्यांचे वाढते हल्ले होवू लागल्याने स्थानिक भीतीच्या छायेखाली जीवन जगत आहेत. स्थानिकांनी वारंवार व्याघ्र प्रकल्पाला कुंपण घालण्याची मागणी केली असून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याचीही मागणी केली आहे.
मात्र शासन स्तरावरुन कोणतीही उपाययोजना केली आजअखेरपर्यंत केली गेली नाही. एवढेच नव्हे तर जखमींना कसलीही नुकसान भरपाई दिली जात नाही. परिणामी संताप व्यक्त होत आहे.