Breaking News

राहुल मर्यादा पाळा: स्वराज


नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. भाजप नेत्या व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ‘राहुल यांनी बोलताना मर्यादा राखावी,’ असे त्यांनी सुनावले आहे.
चंद्रपूर येथे नुकत्याच झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना राहुल यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या अपमानाचा दाखला दिला होता. ‘हिंदू धर्मात गुरू-शिष्याच्या नात्याला विशेष महत्त्व आहे. अडवाणी हे मोदींचे गुरू आहेत; मात्र मोदी कुठलेही नाते मानत नाहीत. गुरू समोर आल्यानंतर साधे हातही जोडत नाहीत. त्यांनी आपल्या गुरूला बुटांनी मारून स्टेजवरून खाली फेकले आहे,’ असे राहुल म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे.

सुषमा स्वराज यांनी ट्विट करून राहुल यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘अडवाणी हे आम्हाला पितृतुल्य आहेत. त्यांच्याबद्दल राहुल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आम्हाला वेदना झाल्या आहेत. त्यांनी बोलताना संयम पाळावा,’ असे त्यांनी म्हटले आहे.