Breaking News

सरसकट कर्जमाफी व शेतमालाला दिडपट भाव देऊ : शरद पवार


बुलडाणा,(प्रतिनिधी): केंद्र व राज्य भाजप सरकारने सर्व सामान्य जनतेला त्रस्त करुन सोडले आहे. शेतकर्‍यांना सळो की पळो करुन सोडले आहे. आजपर्यंत 11 हजार 998 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या ते केवळ शेतकर्‍यांच्या शेत मालाला योग्य भाव दिला नाही म्हणून. आम्ही सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. याआगोदर आम्ही 70 हजार कोटीेची कर्जमाफी दिलेली आहे. आणि आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यासा सरकसट कर्ज माफी करु व शेतकर्‍यांच्या उत्पादित मालाला दिडपट हमी भाव देवू, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारसभेत मार्गदर्शन करताना केली. डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ येथील मलकापूर रोडवरील एआरडी समोरील मैदानावर 15 एप्रिल रोजी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी या सभेस संबोधित करण्यासाठी राष्ट्रीय नेते शरद पवार, काँग्रेसचे मुकूल वासनिक, पिरिपाचे प्रा.जोगेंद्र कवाडे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार राहूल बोंद्रे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी, रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई, पिरीपाचे राजाभाऊ साळवे, माजी आमदार रेखाताई खेडेकर यांच्यासह अनेकांची  प्रमुख उपस्थिती होती. शरद पवार हे प्रचार सभेला संबोधित करत असताना कार्यकर्त्यांमधून चौकीदार चोर है, चौकीदार चोर है अशा घोषणा येत होत्या. तेव्हा पवार साहेबांनी आपल्या मिश्किल शैलीत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत तुम्ही म्हणता ते मान्य आहे असे म्हणत मोदी सरकारची खिल्ली उडवली. पुढे बोलताना पवार म्हणाले की, देशाचा पंतप्रधान राफेल बद्दल अजिबात बोलत नाही, 300 कोटींचे राफेल विमान यांनी 650 कोटीला खरेदी करण्याचा कट यांनी रचला. त्यात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही पवार यांनी केला. मोदींच्या प्रतिमेेबद्दल बोलताना ते म्हणाले की, ज्यांना कागदाचं विमान बनविण्याचा अनुभव नाही अशा अंबानींना सैन्यातील राफेल विमान बनविण्याचा कंत्राट दिला.

मोदींच्या ना खाऊंगा ना खाने दुंगा या प्रतिमेबद्दल शंका व्यक्त करत हे सरकार टाटा, बिर्ला, अदाणी, अंबानींचे सरकार असून या सरकारला आता खाली खेचा, असे आवाहन केले. काँग्रेस नेते मुकूल वासिनिक यांनीही मोदींवर टीका करताना म्हटले की, पंतप्रधान जनतेशी वागताना चित्रपटात जसा खलनायक असतो तशाच पद्धतीने मोदी वागत आहेत. पंतप्रधानांनी देशाला जोडण्याचे काम केले पाहिजे, असा माफक सल्लाही दिला. डॉ.राजेंद्र शिंगणे यांना निवडून आणा डॉ.राजेंद्र शिंगणे यांना मी गेली 25 वर्षांपासून ओळखतो. त्यांना सामाजिक प्रश्‍नांची जाण आहे. ते शरद पवार यांना बोलताना सांगितले की, पवार साहेब तुम्ही येथे ज्या अपेक्षेने आले आहात ती अपेक्षा म्हणजे डॉ.राजेंद्र शिंगणे हे लोकसभेत नक्की जातील तुमची अपेक्षा नक्कीच पूर्ण होईल. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी विद्यमान सरकारवर प्रचंड हल्लाबोल करताना म्हटले की, हे सरकार गोरगरीबांवर अन्याय आणि सर्वसामान्य जनतेशी बेईमानी करणारे आहे. आदानी, मोदी, माल्या यांच्या दारी चौकीदारी करणारे हे सरकार आहे. ते खोटं बोलण्यामध्ये एक नंबर आहेत, त्यांना आता घरी पाठवा. हीच योग्य वेळ आहे असे म्हणत डॉ. शिंगणे यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनीही खासदार प्रतापराव जाधव यांच्याशी दोन हात करण्यास कधीही तयार आहे असे सांगत या खासदारांना खासदार निधीतील 15 टक्के कमीशन घेणं याला जास्त डोकं लागत नाही, असे निर्भिड वक्तव्य करत त्यांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे. खासदारांच्या दहशतीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.

लोणार मतदारसंघातील लोकं आता आम्हाला म्हणतात दादागिरी करणार्‍यांच्या तावडीतून आम्हाला काढा, त्यांना पाहिले की, लोकं घर लावून घेतात त्यांच्या दादागिरीतून मुक्त करा अशा विनवण्या येथील सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. आता फक्त डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, आपली दादागिरीची भाषा नाही विचारांची लढाई आहे. लोकसभेचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर प्रचंड रोष व्यक्त करत म्हटले की, आजपर्यंत जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प उभारला नाही, त्यांना संसदेत धड बोलता येत नाही, त्यांना आता घरी बसवा कारण त्यांच्यात काम करण्याची क्षमता नाही. मी तुमचे सर्व प्रश्‍न सोडविण्यास कटीबद्ध राहील, अशी सादही डॉ. शिंगणे यांनी यावेळी मतदारांना घातली. या प्रचारसभेला प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.