Breaking News

ढाकणी तलावात उरमोडीचं पाणी सोडण्याची मागणी


गोंदवले / विजय भागवत : माण तालुक्यात दुष्काळाने उग्र रूप धारण केले असून माणदेशी जनतेसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्र्न बिकट होतं चाललाय असून ज्या ढाकणी तलाव्यातील विहिरी वरून तालुक्यातील सुमारे सत्तर गावांना साठ टँकरद्वारे लाखो लिटर पाणीपुरवठा केला जातोय, ती विहिर कोरडी पडू लागल्याने सबंधित गावातील जनतेवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ढाकणी तलावात उरमोडीचे तात्काळ सोडले नाही तर तालुक्यातील अनेक गावातील जनतेवर गाव सोडण्याची वेळ येईल, अशी भिती माणदेशी जनता व्यक्त करत आहे. 

माण तालुक्यात 105 महसुली गावे आहेत.माण तालुक्यातील जनतेच्या दुष्काळ हा पाचवीलाच पुजला आहे. यापुर्वीचे माणदेशवासियांनी अनेक दुष्काळ पाहिले,ज्या ज्या वेळी दुष्काळ पडला त्या त्या वेळी शासन प्रशासन दुष्काळावर मात करण्यासाठी पशुधन वाचवण्यासाठी बळीराजाच्यामदतीला धावून येत होते.या वर्षी ऑक्टोबर महिण्यापासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.मागील सात महिने माणची जनता दुष्काळी झळा सोसत आहे.पिण्याच्या पाण्याचे टॅकर सुरू करावेत म्हणून अनेक गावे प्रस्ताव करत होते मात्र सहजासहजी टॅकर सुरू केले गेले नव्हते . हजारो जनावरं चार्याअभावी दावणीवर तडफडत असताना आजही शासनाने चारा छावणी सुरू केली नाही. ही खुप मोठी शोकांतिका आहे.मजुराला तर कोणी गृहीतच धरत नाही. मजुर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.तर माणसा सह जनावर पशु पक्षी पाण्यासाठी भटकंती करत आहेत.
सध्या दुष्काळाची दाहकता वाढली असून पिण्याच्या पाण्याची अवस्था दयनीय झाली असताना माण तालुक्यातील ढाकणी तलाव्यात मागील दोन महिन्यांपूर्वी उरमोडीचे पाणी सोडले होते.त्यामुळे या भागातील शेतकरी व जनतेला काही काळ दिलासा मिळाला होता. 
 
या तलाव्यात वडजल गावासाठी भारत निर्माण योजनेतून पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर पाडली आहे. सध्या ती विहीर अधिग्रहण केली असून त्या विहिरीतून तालुक्यातील कुकुडवाड, पुकळेवाडी, वळई, विरळी, ढाकणी, दिवड, पानवन, जांभुळणी, गंगोती, काळचौंडीत, वरकुटे-मलवडी, पळसावडे, देवापुर, पुळकोटी, रांजणी, धामणी, पर्यंती, भाटकी, संभूखेड, धुळदेव, हिंगणी, कारखेल, इंजबाव, खडकी, हवलदारवाडी, वाकी, वरकुटे, मोही, मार्डी आदी गावांना दररोज लाखो लिटर पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे करण्यात येत आहे. सध्या तालुक्यातील आंधळी, राणंद, पिंगळी, राजेवाडी, सह ढाकणी तलाव कोरडं पडले आहेत. परिणामी, ढाकणी तलाव्यात उरमोडीचे मागील दोन तीन महिन्यापूर्वी सोडलेल्या पाण्याची पातळी घटका मोजू लागल्याने तलाव्यात असलेली विहीर हा टँकर विहीरीवर उभे राहू लागले आहेत. दररोज विहिरीतील पाण्याची पातळी खाली जात असल्याने दररोज पाणीपुरवठा करणारी पाण्यातील विद्युत मोटर रोजच पाण्यात खाली सोडण्याची कसरत करावी लागत आहे. परिणामी, याचा फटका टँकरवर अवलंबून असलेल्या गावांवर होत आहे. अनेक गावांना आठ-दहा दिवस पाणी मिळत नाही. रात्र दिवस टँकरची वाट पहावी लागत आहे. 

येत्या काही दिवसात उरमोडीचे पाणी ढाकणी तलाव्यात सोडले नाही तर पाणीपुरवठा करणारी विहीर कोरडी ठणठणीत पडेल. परिणामी, तालुक्यातील अनेक गावांसमोर पाण्याचे संकट उभे राहणार आहे.
शासन प्रशासन निवडणुकीत गुंतलेले असल्याने जनतेच्या प्रश्र्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा जनता करत असून, तातडीने उरमोडीचे पाणी ढाकणी तलाव्यात सोडले नाही तर तालुक्यातील जनतेवर गावं सोडण्याची वेळ येईल अशी भिती व्यक्त होत आहे.