Breaking News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलग सहावा पराभव कोहलीच्या टीमची पुन्हा हाराकिरी

Image result for रॉयल चॅलेंजर्स


मुंबई : ‘करो या मरो’ या स्थितीमध्ये घरच्या मैदानावर उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून कॅप्टन कोहलीसोबतच त्यांच्या हजारो चाहत्यांनाही मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, बंगळुरूच्या टीमनं पुन्हा एकदा हाराकिरी करत आयपीएलच्या यंदाच्या हंगामातला सलग सहावा पराभव स्वीकारला. त्यामुळे बंगळुरूच्या चाहत्यांची भयंकर निराशा झाली आहे. सामन्याच्या सुरुवातीलाच टॉस दिल्लीचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं जिंकल्यामुळे बंगळुरूच्या चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. सुरुवातीपासूनच बॅटिंगचा भार आपल्या खांद्यावर घेत कॅप्टन विराट कोहली स्वत: पार्थिव पटेलसोबत ओपनिंगला आला. पार्थिवनं पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात देखील तशीच आश्‍वासक केली. पण दुसर्‍याच ओव्हरमध्ये मॉरिसच्या बॉलिंगवर लमिछानेनं पार्थिवचा कॅच टिपला आणि दिल्लीच्या बॉलर्सची बोहनी झाली. त्यानंतर आलेल्या एबी डिव्हिलियर्सनं कोहलीसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न सुरू केला. दोघांची पार्टनरशीप रंगात येत असतानाच रबाडानं धोकादायक एबीला माघारी धाडलं. खराब फटका खेळताना एबीनं इनग्रामच्या हातात झेल दिला. त्यानंतर आलेला स्टॉयनिसदेखील फार काही करू शकला नाही. 11व्या ओव्हरमध्ये स्टॉयनिस आऊट झाल्यानंतर आलेल्या मोईन अलीनं जोरदार फटकेबाजी करत दिल्लीच्या बॉलर्सवर हल्ला चढवला. अवघ्या 18 बॉलमध्ये त्यानं 32 धावा फटकावल्या. त्यात 3 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता. पण लमिछानेच्या बॉलिंगवर पुढे येऊन आक्रमक शॉट खेळणं त्याला महागात पडलं आणि मागे उभ्या असलेल्या रिषभ पंतनं बेल्स उडवून त्याला माघारी धाडलं. सुरुवातीपासून जपून खेळणारा कॅप्टन कोहली अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी करेल, ही उपस्थितांची अपेक्षा देखील फोल ठरली. 18व्या षटकात 33 बॉलमध्ये 41 रन करून कोहली आऊट झाला आणि बंगळुरूच्या मोठ्या धावसंख्येच्या स्वप्नांवर पाणी फिरलं. तळाच्या बॉलर्सकडून फार काही होऊ न शकल्यामुळे बंगळुरूचा डाव अवघ्या 149 रनांवर आटोपला.
दिल्लीच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. भरवशाचा शिखर धवन पहिल्याच बॉलवर साऊदीच्या बॉलिंगवर आऊट झाला. पण बंगळुरूचा हा आनंद फार काळ टिकला नाही. तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या कॅप्टन रिषभ पंतने ओपनर पृथ्वी शॉसोबत बंगळुरूच्या बॉलर्सची धुलाई सुरू केली. पृथ्वी शॉने टीम साऊदीच्या दुसर्‍या ओव्हरमध्ये 5 चौकार वसूल करत पुढे काय वाढून ठेवलंय याचा अंदाज बंगळुरूच्या बॉलर्सला दिला. थेट 9व्या ओव्हरमध्ये नेगीनं पृथ्वी शॉची विकेट काढेपर्यंत त्यानं टीमला 69 रनांपर्यंत आणून ठेवलं होतं. त्यानंतर कॅप्टन श्रेयस अय्यरनं सगळी सूत्र आपल्या हातात घेतली. कोलीन इनग्रामसोबत अय्यरनं 39 रनांची पार्टनरशीप केली. इनग्राम आऊट झाला, तेव्हा दिल्लीला 41 बॉलमध्ये 42 रनांची आवश्यकता होती.