Breaking News

कांदा उत्पादक शेतकर्‍यांना नुकसानीचा तडाखा


राहुरी/प्रतिनिधी : अचानक येणार्‍या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना नुकसानीचा तडाखा बसत आहे. शेतात काढून ठेवलेल्या कांद्याला वाचवण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरु आहे. या अचानक येणार्‍या पावसामुळे शेतकर्‍यांची तारांबळ उडत आहे. 

वीजांच्या कडकडाटासह वादळी वारे सुरू झाल्यामुळे व अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे कांदा व गहु उत्पादकांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतामध्ये काढलेला कांदा झाकण्याची शेतकर्‍यांची धडपड पहायला मिळत आहे. दोन दिवसांपासून बाजारात कांदा झाकण्यासाठी तळवट खरेदीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. शेतकर्‍यांना कांद्याचे उत्पादन घेताना भरमसाठ खर्च येतो. सध्याच्या बाजारभावामुळे खर्चही निघणार नाही अशी परीस्थिती आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी नशिबावर हवाला ठेऊन कांदा भुसारे भरविण्यास पसंती दिली आहे. मात्र, याच काळात आता अवकाळी पावसाची भर पडल्यामुळे भीतीने शेतकर्‍यांची गाळण उडाली आहे. 

काढणीला आलेल्या गव्हाचेही नुकसान होत असून शेतकर्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. सध्याच्या दरात कांदा विकणे परवडणारे नसल्याने त्यातच अधिकचा खर्च करुन कांदा साठविला आहे. कांदा व्यापारीही कांद्याच्या दराबाबत ठोस भाव देत नाहीत. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. सध्याच्या काळात राहुरी बाजार समितीमध्ये कांद्याला पाचशे ते आठशे रुपयांच्या आसपास दर आहे. त्यामुळे कांदा विकण्यास शेतकरी धजावताना दिसत नाही.