Breaking News

शासकीय रुग्णालयाच्या सुरक्षेचे 'तीन-तेरा'; रुग्ण होतात 'नौ-दो-ग्यारा'अहमदनगर/प्रतिनिधी

शासकीय जिल्हा रुग्णालयांमार्फत माफक दरांत पूर्ण आरोग्य सेवा मिळणे हा उद्देश असतो. परंतु जिल्हारुग्णालयांमधून रुग्णांची होणारी हेळसांड, अपुऱ्या सुविधा, अपुरा कर्मचारी पुरवठा , कामातील ढिसाळपणा आदींमुळे सर्वसामान्यांच्या मनातील शासकीय रुग्णालयाबद्दल असणारी विश्वसनीयता कमी होत चालली आहे. याबाबत अनेकदा प्रसारमाध्यमांतून टीका झाली. परंतु परिस्थिती 'जैसे थे' च आहे. रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्थाही कुचकामी आहे. अनेकदा रुग्णालयामधून रुग्ण गायब होतात. त्यांच्या नावापुढे 'पळाला ' असा शेरा देऊन यंत्रणा गप्प बसते. परंतु सुरक्षा व्यवस्था उत्तम असेल , सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असेल तर असे प्रकार घडणार नाहीत.परंतु रुग्णालयाची सुरक्षा यंत्रणाच कुचकामी असल्याने रुग्ण गायब होण्याचे अनेक प्रकार याठिकाणी घडतात. याचा मनस्ताप रुग्णांच्या नातेवाईकांना सहन करावा लागतो.

दि. 3 एप्रिल रोजी केडगाव येथील एका हॉटेलमधील कर्मचारी सोमनाथ बनसोडे याला अचानक त्रास व्हायला लागल्याने तेथीलच एका कर्मचाऱ्याने त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. त्या रुग्णासोबत असणारे त्याचे नातेवाईक जेवणाचा डब्बा आणण्यासाठी गेले असता परत येईपर्यंत रुग्ण दवाखान्यामध्ये नव्हता. नातेवाईकांनी अनेक ठिकाणी चौकशी केली. परंतु पेशंट आढळून आले नाही. परंतु या दरम्यान रुग्णालयामधून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाद्वारे त्या रुग्णची माहिती उपलब्ध झाली असती परंतु तेवढीही दखल रुग्णालयाने घेतली नाही. उलटपक्षी संबंधित नातेवाईकांनाही पुरेशी माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिली नाही. अशी माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली. याबाबत अधिक विचारले असता याची तक्रार आम्ही पोलिसांकडे केली असून पुढील जबाबदारी त्यांची आहे असे सांगितले जाते. परंतु याठिकाणी असणाऱ्या पोलिसकक्षामध्ये कायमस्वरूपी पोलिस उपलब्ध नसतात असा अनुभव या रुग्णांच्या नातेवाईकांना येतो अशी माहिती सोमनाथच्या नातेवाईकांनी दिली.

केवळ १५ सुरक्षा रक्षक

संपूर्ण रुग्णालयासाठी १५ सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. परंतु हे सुरक्षा रक्षक 5 वाजेपर्यंतच उपलब्ध असतात. त्यानंतरची सुरक्षा 'रामभरोसे' चालते. उपलब्ध वेळेतही त्यांना 'इतर' काही कामे असतात . त्यामुळे ठरलेल्या वेळेतही हे रक्षक उपलब्ध होत नाही.

पुरुष कक्षामध्ये दोनच 'महिला' कर्मचारी

पुरुष कशामध्ये ३३ बेड ची व्यवस्था आहे. परंतु या पुरुष कक्षामध्ये केवळ २ महिला कर्मचारी आहेत. त्या ठिकाणी पूर्णवेळ सुरक्षारक्षकही उपलब्ध नाहीत. त्यामुळे या महिला कर्मचाऱ्यांनीही सुरक्षा धोक्यात आहे. आणि या कहमधूनच रुग्ण गायब होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.


'सीसीटीव्ही' बाबत कर्मचाऱ्यांमध्येच साशंकता

रुग्णालयांमधील काही कक्षांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. परंतु या सीसीटीव्ही चालू आहे कि नाहीत याबात कर्मचाऱ्यांनाच कल्पना नाही. याचे चित्रीकरण कोठे होते? नेमके कोणत्या क्षेत्राचे चित्रीकरण होते ? मुळात चित्रीकरण होते कि नाही याबातच आम्हाला कल्पना नसल्याचे येथील एका महिला कर्मचाऱ्याने सांगितले.


जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन सुरक्षेच्या बाबतीत कमी पडत आहे असे म्हणता येणार नाही. प्रत्येक रुग्णाकडे वैयक्तिक लक्ष पुरवणे शक्य नसते. बऱ्याचदा रुग्ण फेरफटका मारण्यासाठी, नातेवाईकांना भेटण्यासाठी बाहेर पडतात. आणि मग पळून जातात. आम्ही अशा केसेसबद्दल माहिती पोलिसांना देतो. तेव्हा त्या रुग्णांचा शोध घेण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.

- डॉ. पोखरना, आर.एम.ओ. (जिल्हा शासकीय रुग्णालय )