Breaking News

भिमनगर येथे डॉ. बाबासाहेबांची जयंती उत्साहात


वरकुटे-मलवडी / प्रतिनिधी : भारत देशातील समस्त मानवजातीला संविधानाच्या माध्यमातून सामाजिक समता, बंधुता, हक्क आणि अधिकार मिळवून देणारे आणि अनादी काळापासून अन्याय, जुलूम जबरदस्तीच्या जोखडातून वंचित, शोषित, पिडित समाजाला मुक्ती देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच खरे महामानव ठरले. अशा प्रकारचे प्रतिपादन माण पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव जगताप यांनी केले.

फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच आयोजित महिला कार्यकारणीच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती भिमनगर(बेघर वसाहत) या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. समाजमंदिरासमोर आयोजित केलेल्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सचिन होनमाने,पोलिस पाटील धनंजय सोनवणे, काशिनाथ आटपाडकर, डॉ. विकास जगताप, बियांंदसिंग जगताप, बुन्नु तांबोळी नारायण तोडकर (पंच), आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा मिनाताई बनसोडे व मंगल बनसोडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले, सामुदायिकरित्या त्रिसरण पंचशील म्हणून बुद्धपुजा करण्यात आली.
यावेळी मिनाताई बनसोडे, सचिन होनमाने, काशिनाथ आटपाडकर, डॉ.विकास जगताप, बियांदसिंग जगताप, सिद्धार्थ बनसोडे, बुन्नु तांबोळी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित विचार मांडले.शालेय विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित पोवाडा, भाषणं सादर केली. यावेळी बौद्ध महिला संस्कार शिबिरात श्रामणेर झालेल्या महिला उपासिकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने महिला व बहुजन बांधव उपस्थित होते.जयंतीउत्सवाचे चांगले नियोजन महिलांनी केल्याबद्दल उपस्थित सर्वांनी भरभरून कौतुक केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतमी बनसोडे यांनी केले. गजेंद्र सरतापे यांच्यातर्फे उपस्थित सर्वांना नाष्टा आणि चहापाण्याची सोय करण्यात आली होती.

डॉ. आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त बौद्धविहारात पहिल्यांदाच 13 एप्रिल रोजी रात्री 12 ते 1:30 वा. सामुदायिक त्रिसरण पंचशील म्हणून बौद्धपुजा घेण्यात आली. यावेळी महिलांनी मोठ्या उत्साहात तथागत गौतम बुद्ध व बौद्धीसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गीते, पाळणा म्हणून आनंदोत्सव साजरा केला. 

यावेळी बौद्ध विहारात सुंदर रांगोळी काढून.128 मेणबत्त्या प्रज्वलीत करण्यात आल्या होत्या त्यामुळे बौद्धविहार उजळून निघाले होते.