Breaking News

देशभक्तीची नवी व्याख्या आम्हाला शिकव पाहताहेत;सोनिया गांधी यांची टीका; मोदी यांचा नामोल्लेख टाळून प्रत्युत्तर


नवीदिल्लीः काही लोक देशभक्तीची नवी व्याख्या आम्हाला शिकवू पाहत आहेत. या देशात सुरुवातीपासूनच विविधता आहे, तरीही हा देश एक आहे; मात्र आता हे वैविध्य न स्वीकारणार्‍यांना देशभक्त म्हटले जाते आहे. आम्ही काय खावे? कोणते कपडे घालावेत? हेदेखील आम्हाला शिकवले जाते आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते आहे, अशी घणाघाती टीका संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली.
दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख टाळून; परंतु टीकेचा रोख त्यांच्याकडेच वळवून सोनिया म्हणाल्या, की या लोकांची मनमानी आम्ही सहन करावी अशी अपेक्षा ठेवली जाते आहे. लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम रंगला आहे. अशात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एकीकडे मोदी हे गांधी घराण्यावर टीका करताना दिसत आहे. तसेच त्यांनी शरद पवारांवरही टीका केली. शरद पवारांनी त्या टीकेला प्रत्युत्तरही दिले. आता सोनिया यांनी मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसला देशभक्तीची नवी व्याख्या शिकवली जाते आहे, असा आरोप सोनिया यांनी केला आहे.

देशात गोमांसाच्या मुद्द्यावरूनही हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. याकडेही सोनिया यांनी लक्ष वेधले. आम्ही काय खायचे, प्यायचे? कपडे कसे परिधान करायचे हेदेखील आता काही ठराविक लोक ठरवणार का, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते आहे, असेही त्यांनी त्यांच्या भाषणात म्हटले आहे. आम्ही ठराविक वर्गाची मनमानी का सहन करायची, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला आहे.