Breaking News

राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर शिवसेनेच्या वाटेवर

जयदत्त क्षीरसागर साठी इमेज परिणाम

‘मातोश्री’वर घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
मुंबई : राष्ट्रवादीचे नाराज आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी शनिवारी मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे, क्षीरसागर लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. गेले काही महिने नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षिरसागर यांचे मातोश्रीवर येण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकारणात लवकरच मोठी उलथा पालथ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

राष्ट्रवादीचे नाराज आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली भूमिका जाहीर केली होती. ‘भाजपला मदत करून विजयाची गुढी उभारा. डॉ. प्रीतम मुंडे यांना मतदान करा,’ असं जाहीर आवाहन आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं होतं. जयदत्त क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलवली होती. याच बैठकीतून आमदार क्षीरसागर यांनी आपला लढा कुणाविरुद्ध आहे, यबाबत अप्रत्यक्ष भाष्य केलं. जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या लोकसभा उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या मदतीची भूमिका घेतली असली तरीही आपण कोणत्या पक्षात जाणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. याचा निर्णय 18 एप्रिलला घेऊ, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यात त्यांनी गुढीपाडव्याला उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

जयदत्त क्षीरसागर हे गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी आणि धनंजय मुंडे यांच्यावर नाराज आहेत. याच पार्श्‍वभूमीवर त्यांनी कार्यकर्तांची बैठक बोलवली होती. यामध्ये ते आपल्या राजकीय वाटचालीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या बैठकीत क्षीरसागर समर्थकांकडून धनंजय मुंडेंसह पक्ष नेतृत्वावर सडकून टीका करण्यात आली. ‘मागच्या दरातून आलेले, घर फोडणारे, गुंडगिरी करणारे यांना धडा शिकवा,’ असं म्हणत धनंजय मुंडेंवर निशाणा साधण्यात येत होता. ‘ज्या पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही. विश्‍वासात घेतलं जात नाही. वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात असेल तर अशा राष्ट्रवादी पक्षात अण्णांनी का राहावं? असा सवाल जाहीर भाषणात क्षीरसागर समर्थकांनी केला होता.