Breaking News

उज्वला योजनेतील लाभार्थींचा चुलीवर स्वयंपाक!


नवीदिल्लीः बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये उज्वला योजनेचे 85 टक्के लाभार्थी अजूनही चुलीवर स्वयंपाक करत आहेत. लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारने आपल्या महत्वकांक्षी योजनांच्या यशाचा धुमधडाक्यात प्रचार सुरू केला आहे. यामध्ये प्रधानमंत्री उज्वला योजनेचाही समावेश आहे. नुकतीच या योजनेबाबतची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोफत एलपीजी गॅस जोडणी झालेल्या चार राज्यातील सुमारे 85 टक्के लाभार्थी अजूनही चुलीवर स्वयंपाक बनवत आहेत.

बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये उज्वला योजनेचे 85 टक्के लाभार्थी अजूनही चुलीवर स्वयंपाक करत आहेत, असे ‘रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर कॅम्प्समेंट इकॉनॉमिक्स’च्या (आरआयसीई) अहवालात म्हटले आहे. यामागे आर्थिक कारणांबरोबर लैंगिक असमानता असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
चुलीवर स्वंयपाक करताना त्यातून निघणार्‍या धुरामुळे नवजात बालकांचा मृत्यू, बालकांच्या वाढीत अडचणी, त्याचबरोबर ह्दय आणि फुफ्फुसाच्या आजारांची भीती असते. हा सर्वे 2018 च्या अखेरीस करण्यात आला आहे. यामध्ये चार राज्यातील 11 जिल्ह्यातील 1550 कुटुंबीयांचे यादृच्छिक (रँडम) नमुने घेण्यात आले. या परिवारातील 98 टक्क्यांहून अधिक घरात चूल आढळून आली होती. उज्वला योजनेचे लाभार्थी अति गरीब असल्याकारणाने त्यांना सिलिंडर संपल्यानंतर तो पुन्हा घेता येत नाही, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.
सुमारे 70 टक्के कुटुंबीयांना चुलीसाठी लागणार्‍या सरपणावर काहीच खर्च करावा लागत नाही, असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. सिलिंडरच्या तुलनेत त्यांना चूल स्वस्त पडते. महिला शेणाच्या गोवर्‍या थापतात, तर पुरुष लाकडे कापून आणतात. बहुतांश लोकांना गॅसवर स्वंयपाक बनवणे सोपे वाटते; पण चुलीवर स्वंयपाक चांगला शिजतो. विशेषत: चपाती, भाकरी, रोटी चुलीवर चांगली होते. गॅसवर स्वंयपाक केल्यास पोटात गॅस बनतो, अशी ग्रामीण भागातील महिलांची धारणा आहे. त्यामुळे उज्वला योजनेबाबत जागरुकता वाढवण्यावर जोर देण्यास या अहवालात सुचवले आहे.


आठ कोटींना गॅसजोडणी

उज्वला योजना 2016 मध्ये सुरू झाली होती. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबाना मोफत गॅस सिलिंडर, रेग्युलेटर आणि पाइप दिले जातात. सरकारी आकडेवारीनुसार या योजनेच्या माध्यमातून आठ कोटी कुटुंबीयांना गॅस जोडणी दिलेली आहे. भाजपचा जाहीरनामा प्रकाशित करताना राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीच ही आकडेवारी दिली. गॅसजोडणी देऊन उपयोग नसतो, तर पुन्हा गॅस खरेदीची क्षमता त्या कुटुंबात होत नाही, तोपर्यंत त्या जोडणीलाही अर्थ नसतो. त्यामुळे चुलीचा वापर सुरूच राहतो.