Breaking News

देशातील दोनशे शास्त्रज्ञांचा भाजपला विरोध?



देशद्रोही म्हणणार्‍यांना मतदान न करण्याचे आवाहन; थेट पक्षाचे नाव टाळले
नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आता देशातील 200 शास्त्रज्ञांनीही मतदारांना आवाहन केले आहे. आपल्या विरोधकास देशद्रोही म्हणणार्‍यांना मतदान करू नका, असे आवाहन देशातील 200 वैज्ञानिकांनी केले आहे. देशाच्या प्रमुख संस्थेमधील वैज्ञानिकांनी हे आवाहन केले आहे. तसेच आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून मतदान करा, असेही त्यांनी म्हटले; मात्र आपल्या आवाहनामध्ये कुठल्याही पक्षाचा उल्लेख या वैज्ञानिकांनी केला नाही.
विरोधकांना देशद्रोही ठरवणे आणि जात, धर्म, भाषेच्या आधारावर देशातील नागरिकांत फूट पाडणे ही पद्धत केवळ शास्त्रज्ञांसाठीच नसून लोकशाहीसाठीही धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या पाच वर्षांत निवडून आलेल्या राजकीय नेत्यांकडून शास्त्रज्ञांच्या विचारप्रणालीवर हल्ला करण्यात आला आहे. शिक्षण, विज्ञान आणि लोकशाहीबाबात हे लोक टीकात्मक धोरण अवलंबतात. त्यामुळे याबाबतही शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेस’ चेन्नई येथील ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ सिताभ्रा सिन्हा यांनी 1799 मध्ये स्पॅनिश आर्टिस्ट फ्रांसिस्को गोया यांच्या छायाचित्राचा अहवाल देत म्हटले, की गोयाच्या शब्दात सांगायचे झाल्यास, जेव्हा चर्चा बंद होते आणि तर्क झोपी जाते, तेव्हा राक्षसाचा जन्म होतो. ‘नॅशनल मेडिकल ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्स’मधील एक ख्यातनाम प्रा. पार्थ मजदूमदार यांनी म्हटले आहे, की एका शास्त्रज्ञाच्या नाते मला त्या लोकांपासून सावधान राहिले पाहिजे, जे विद्यार्थी आणि समाजाला विघातक बनवत आहेत.
पुण्यातील ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन आणि रिसर्च’मधील प्रा. सत्यजीत रथ म्हणाले, की शास्त्रज्ञांनी हे असामान्य पाऊल उचलण्याचे धाडस दाखवले. कारण भारतच नाही तर जगभरात मागास दिसणारी प्रतिगामी राजकीय विचारधारा आमच्यासाठी चिंतेची बाब बनली आहे. दरम्यान, यापूर्वी काही कलाकार आणि माजी सैनिकांमध्ये या बाबीवरुन मतभेद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आता, शास्त्रज्ञांनीही याबाबत देशातील स्थिती वर्णन करताना, कुठल्याही पक्षाचे नाव न घेता मतदारांना आवाहन केले आहे. त्यावर अन्य काही शास्त्रज्ञांची प्रतिक्रिया येते, की काय हे आता पाहायचे.