Breaking News

ओमराजेंंविरोधात गुन्हा दाखल; अडचणींत भर; आत्महत्येला भाग पाडल्याच्या गुन्ह्यानंतर आता चारित्र्यहननाचा गुन्हा


उस्मानाबाद / प्रतिनिधीः तडवळा येथील शेतकर्‍याने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली असल्याचे उदाहरण ताजे असतानाच ओमराजे निंबाळकर यांच्यासमोर आणखी एक नवीन संकट निर्माण झाले आहे. शिवसेनेचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनीच त्यांच्याविरोधात उमरगा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिवीगाळ, आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून तो व्हॉट्सअ‍ॅपद्वारे व्हायरल करीत आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून प्रतिमा मलीन केल्याचे त्यांनी अर्जात म्हटले आहे. त्यानुसार राजेनिंबाळकर यांच्याविरोधात अब्रुनुकसानीबद्दल तसेच माहिती व तंत्रज्ञान प्रसारण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमात ओम राजेनिंबाळकर यांची एक चित्रफीत वेगाने प्रसारीत झाली होती. या व्हायरल चित्रफीतप्रकरणी खा. गायकवाड यांनी उमरगा पोलिस ठाण्यात आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून अश्‍लील भाषेत शिवीगाळ करून समाजातील आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न ओमराजे करीत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. तक्रारीत निंबाळकर यांनी अत्यंत अश्‍लील भाषेचा वापर करून वाईट पद्धतीचे संभाषण केले असल्याचे नमूद केले आहे. 10 टक्के कमिशन घेवून राष्ट्रवादीला विकासकामांसाठी निधी दिला असल्याचे या चित्रफितीत म्हटले आहे. जनमाणसात आपल्याबद्दल त्यामुळे उलटसुलट चर्चा होत आहे. त्यामुळे आपली प्रतिमा मलीन झाली असून चारित्र्यावर शिंतोडे उडविले गेले आहेत, असेही या निवेदनात म्हटले आहे.


अश्‍लील भाषेत केलेल्या संभाषणाची चित्रफीतदेखील गायकवाड यांनी पोलिसांकडे दाखल केली आहे. त्याचबरोबर तक्रार अर्जासोबत चित्रफितीची एक प्रत जिल्हा पोलिस अधीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिस उपअधीक्षक यांच्याकडेही दाखल केली आहे. शिवसेनेच्या खासदारांनीच सेना उमेदवाराच्या विरोधात दिलेल्या तक्रारीमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. खासदार गायकवाड यांच्या तक्रारीमुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. निवडणुकीच्या एक दिवस अगोदर दाखल झालेल्या या तक्रारीमुळे शिवसेनेचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांच्यासमोरील अडचणीत भर पडली आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचीही तक्रार

तडवळे गावातील दिलीप ढवळे या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याने मृत्यूपूर्वी ओम राजेनिंबाळकर यांच्या नावे चिठ्ठी लिहिली आहे. त्यामुळे ओम राजेनिंबाळकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली होती. या घटनेला पाच दिवस उलटून गेले, तरी अद्याप गुन्हा नोंद न झाल्यामुळे ढवळे यांचे बंधू राज ढवळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे याबाबत तत्काळ गुन्हा नोंदवून न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन सादर केले आहे. शरद पवार यांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले होते.