Breaking News

उमेदवार आपला नसल्याचा लोखंडेंवर आक्षेप


नगर / प्रतिनिधीः गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत 13 दिवसांत मोदी लाटेत खासदार झालेल्या सदाशिव लोखंडे यांना या वेळच्या निवडणुकीत मात्र उमेदवार आपला नाही, या भावननेचा फटका बसण्याची शक्यता आहे. शिवसैनिक त्यांना आपले मानत नाही, तर भाजपने त्यांना केव्हाच पराया करून टाकले आहे. मतदार त्यांना ओळखत नाहीत, ही त्यांची आणखी एक दुखरी बाजू आहे.

लोखंडे मूळचे भाजपचे. त्यानंतर ते मनसेत जाऊन सोईसाठी शिवसेनेत आले. खासदारही झाले. मातोश्रीला सांभाळायचे, शिवसैनिकांना नाही, ही त्यांची वृत्ती आता त्यांच्या अंगलट आली आहे. शिवसैनिक शेवटपर्यंत लोखंडे यांची उमेदवारी बदला, असा आग्रह धरीत होते. त्याचे कारणही तेच आहे. दोन दिवसांपूर्वी कोपरगावमध्ये एका पदयात्रेला आले असताना तिथे असलेल्या एकाने उमेदवार कोण अशी विचारणा केली. त्यावर खा. लोखंडे यांची ओळख करून देताच यांना तर गेल्या पाच वर्षांत आपण पाहिलेच नाही बुवा, अशी हेटाळणीची प्रतिक्रिया व्यक्त झाली. गेल्या पाच वर्षांत फारसा संपर्क नसल्याचा हा परिपाक आहे. मातोश्रीला सांभाळले, की इतरांना सांभाळायची गरज नाही, हे त्यांचे वर्तन आता त्यांच्या अंगलट यायला लागले आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचार, रॅली, संपर्क दौरे यांचा खर्च कुणी करायचा, असा प्रश्‍न कार्यकर्ते करीत आहेत. घरचे खाऊन लष्कराच्या भाकरी भाजण्यास कुणी तयार नाही.

खासदार लोखंडे यांनी गेल्या पाच वर्षांत शिर्डीत संपर्क कार्यालय सुरू केले, तरी अन्य विधानसभा मतदारसंघात त्यांनी संपर्क कार्यालय सुरू करून तिथे थांबण्याची तसदी घेतली नाही. अर्थात शिर्डीतही त्यांचा फार कमी संपर्क असतो. त्यांनी आतापर्यंत निळवंडे कृती समितीशी जुळवून घेतले, तरी तिथेही गटबाजी झाली. बाळासाहेब विखे यांच्याकडं संस्थात्मक बळ होते. त्यांचा संपर्क दांडगा होता. त्यानंतर खासदार झालेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी येथील साई संस्थानच्या माध्यमातून अनेकांची कामे केली होती. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधून त्यांनी काम केले होते. त्यांचा नातेवाइक परिवार शिर्डी लोकसभा मतदारसंघातलाच आहे. शिवाय त्यांचा संपर्क दांडगा होता. खासदार झाल्यानंतर आणि खासदारकी गेल्यानंतरही त्यांचा संपर्क सातत्याने सुरूच राहिला. खासदार निधी तसेच अन्य निधींच्या वापरात आणि मतदारसंघाचे प्रश्‍न मांडण्यातही त्यांची आघाडी होती. लोकांसाठी स्वतःच्या खिशाला चाट बसू दिली नाही, तरी दुसर्‍यांच्या खिशातून काढून लोकांच्या खिशात घालण्याची कला त्यांना चांगलीच अवगत होती. त्या तुलनेत संपर्क आणि विकासकामांच्या बाबतीत लोखंडे फारच कमी पडले. वाकचौरे शिवसेनेत होते, तोपर्यंत सर्वांना धरून होते. भाजपच्या नेत्यांशीही त्यांचा चांगला संपर्क होता. लोखंडे यांचे तसे नाही. शिवसैनिकांनाही ते आपल्यावर लादलेला उमेदवार म्हणून वाटतात, तर भाजपतून नंतर ते थेट मनसेत जाऊन तिथून लढल्याचे दुःख भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे. भाजपच्या नेत्यांना ते आपले उमेदवार वाटत नाहीत.

लोखंडे यांचे गाव या मतदारसंघात येत नाही. असे असले, तरी त्यांना संपर्कातून मतदारसंघांशी चांगले नाते जोडता आले असते. तेही त्यांना जोडता आले नाही. अधूनमधून पर्यटनासारखा मतदारसंघात येणारा खासदार अशी त्यांची ओळख आहे. भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत एकी निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले नाहीत. माध्यमांतील ठराविक लोकांशी संपर्क ठेवण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे माध्यमांतही त्यांच्याविषयी चांगली भावना नाही. खासदार कधी येतात, कधी जातात, याची जनतेला आणि कुणालाच माहिती नसते. वाकचौरे आणि खा. दिलीप गांधी जिल्ह्याच्या प्रश्‍नावर कायम एकत्र असायचे. बैठका एकत्रित घ्यायचे. लोखंडे यांच्याबाबतीत ते अपवादानेच झाले.

जातीय समीकरणेही विरोधात

शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि खासदार सदाशिव लोखंडे हे तीनही प्रमुख उमेदवार एकाच समाजाचे आहेत. त्यामुळे त्यांच्यात त्यांच्या समाजाच्या मतांचे विभाजन होईल. वंचित आघाडीचे संजय सुखधान हे एकमेव बौद्ध उमेदवार आहेत. त्यांच्या समाजाची मते त्यांना मिळण्याची शक्यता असल्याने या मतविभागणीचा फटका लोखंडे यांनाच बसणार आहे.