Breaking News

शेतकर्‍यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यावर सरकारचा भर


वडूज / प्रतिनिधी : शाश्वत पाणी व हमीभावाने खरेदी या शेतकर्‍यांच्या महत्वाच्या दोन मूलभूत गरजा आहेत. त्या पूर्ण करण्यावर सद्याच्या केंद्र व राज्य सरकारने भर दिला आहे असे ठोस प्रतिपादन राज्याचे महसूल, बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

येथील मनिष हॉलमध्ये आयोजीत केलेल्या भारतीय जनता पाटी, शिवसेना, रासप व मित्रपक्षांचे माढा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील,पिंपरी चिंचवड प्राधिकरणचे अध्यक्ष सदाभाऊ खाडे, शेखर चरेगावकर, डॉ. दिलीपराव येळगावकर, बाबुराव माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, जितेंद्र पवार, अविनाश कोळी, सचिन गुदगे, जीवनशेठ पुकळे, बाळासाहेब खाडे, रासपचे दिलीपराव डोईफोडे, श्रीकांत देवकर, काकासाहेब मोरे, वचन शहा, अनिल माळी, डॉ. राजेंद्र खाडे, डॉ. उर्मिला येळगावकर, सौ. किशोरी पाटील, ऍड. अनिता पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री पाटील म्हणाले, युती शासनाच्या धाडसी निर्णयामुळेच खटाव माण या दुष्काळी तालुक्यांना उरमोडी, टेंभू , तारळी या योजनांचे पाणी मिळत आहे. नजिकच्या काळात जिहे कठापूरचेही पाणी मिळणार आहे. शासनाने कापूस, तूर डाळ हमीभावाने खरेदी केल्यामुळेच या व इतर पिकांना बाजारात चांगला दर मिळाला. विकासकामांची गती कायम राखण्यासाठी माढा मतदार संघातून युतीच्या उमेदवाराला बहुमताने निवडून दयावे.
श्री. मोहिते-पाटील म्हणाले, या मतदार संघाचे विजयसिंह मोहिते- पाटील प्रतिनिधित्व करीत होते. त्यांनी सुचविलेल्या रेल्वे व इतर सर्व महत्वाच्या कामांना सद्याच्या केंद्र शासनाने चांगल्या प्रकारे सहकार्य केले. दुष्काळी भागांतील पाणी योजनांची कामे गतीमान करण्यामध्ये युती शासनाचा मोठा वाटा आहे असा गोडवाही त्यांनी भाषणात गायला.

डॉ. येळगावकर म्हणाले, युतीच्या उमेदवाराचे तळागाळातील कार्यकर्ते प्रामाणिक काम करीत आहेत. जे काम करतात त्यांनाच त्याचे श्रेय मिळावे तसेच चांगल्या माणसांनाच पक्षात प्रवेश द्यावा.

यावेळी श्री. चरेगावकर, श्री. देसाई, प्राचार्य डोईफोडे, श्री. जाधव, अंकुशराव दबडे, प्रा. अजय शेटे यांचीही भाषणे झाली. प्रत्येक वक्त्याने नाईक-निंबाळकरांना मताधिक्य देण्याची ग्वाही दिली. तालुकाध्यक्ष विकल्पशेठ शहा यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सदाशिव खाडे यांनी सुत्रसंचालन केले. प्रशांत कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी तालुका उपाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, मंदार जोशी, सतिश शेटे, प्रदिप शेटे, जयवंत पाटील, व्ही. डी. बाबर, सयाजी पाटील, चंद्रकांत घार्गे, अनिल पवार, मानसी तोरो, शुभांगी फडतरे, गोपीनाथ खाडे, गणपत खाडे, प्रकाश हांगे, जालींदर माळी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात कॉंग्रेसचे बाजार समितीचे संचालक काकासाहेब मोरे, डांभेवाडीच्या सरपंच यमुना देशमुख, सुनिल मोरे, ज्येष्ठ नेते विश्वासराव काळे, चंद्रकांत काळे, आप्पा गोडसे आदींनी भाजपात जाहीर प्रवेश करून उमेदवारांना मताधिक्क्य देण्याचा निर्धार केला.