Breaking News

राजकीय पक्षांकडून आरक्षणाची विटंबना - सुरेंद्र थोरात


देवळाली प्रवरा / प्रतिनिधी: शिर्डी लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून सर्वच राजकीय पक्षांकडून एका विशिष्ट समाजालाच उमेदवारी देण्यात येते. तर आंबेडकरी चळवळीतील दलित, मातंग व बौद्ध समाजातील उमेदवारांना डावलण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाची विटंबना होत आहे. असा आरोप रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केला . आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले याप्रश्‍नी चर्चा करण्यासाठी दि. 4 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेणार आहे. त्यानंतरच दलित समाज, मातंग व बौद्ध समाज निर्णय घेणार आहे. अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा थोरात यांनी दिला .

शिर्डी लोकसभा मतदारसंघ आरक्षित झाला आहे. मात्र, गेल्या दहा वर्षापासून आरक्षणात केवळ एका विशिष्ट समाजालाच प्राधान्य दिले जात आहे. आमचा त्या समाजाला विरोध नाही. मात्र, काही प्रस्थापित राजकारणी मंडळीच दलित, मातंग व बौद्ध समाजाला डावलतात. हा समाज आपआपल्या पक्ष, गट व संघटनांशी प्रामाणिकपणे राहून मुख्य प्रवाहात सहभागी होतो. मतदानाच्या वेळी सर्वच पक्षांना या समाजाची आठवण येते.मात्र, राजकीय फायद्याच्या वेळी या समाजाला उमेदवारीपासून व राजसत्तेपासून उपेक्षित ठेवले जाते. गेल्या दहा वर्षापासून आरक्षण मिळाल्यानंतर या विशिष्ट समाजातील काही इच्छुक उमेद्वार शिर्डी मतदारसंघाच्या बाहेरून आयात केले जातात. त्यांना उमेदवारी दिली जाते. असा आरोप थोरात यांनी केला.