Breaking News

उंडाळे- ढेबेवाडी शटल बससेवेची प्रवाशांची मागणी


उंडाळे / प्रतिनिधी : उंडाळे (ता. कराड) येथुन ढेबेवाडी येथे जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटीची शटल बससेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातुन होवू लागली आहे. कराड दक्षिण भागाला पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसर जवळ आहे. या दोन्ही तालुक्यात रस्त्यावर दळणवळण आणि वाहतूकही वाढली आहे. मात्र प्रवाशांना प्रवास करण्यासाठी बससेवा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

उंडाळे भागातील लोकांना ढेबेवाडी येथून पाटण येथे जाण्यासाठी प्रवाशांना जवळच्या मार्गाने बसची सोय होण्याची गरज असून ही सेवा नसल्याने प्रवाशांना कराडहुन फिरुन जावे लागत आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाने उंडाळे- तुळसण मार्गाने कोळेवाडी- तळमावले - ढेबेवाडी अशी शटल बससेवा सुरू केल्यास ही बससेवा प्रवाशांना अत्यंत जवळची व वेळ वाचविला जावू शकतो. उंडाळे येथुन ढेबेवाडीचे अंतर सुमारे 20 कि. मी आहे, तर हेच अंतर कराडहुन 40 कि. मी आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. शिवाय दर मंगळवारी व संकष्टी चतुर्थी दिवशी कोळे येथील गणपती मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी विभागातुन मोठ्या प्रमाणात खाजगी वाहनांची मोठी गर्दी असते. तसेच या मार्गावर काही वर्षांपूर्वी असणारी कराड ते तुळसण ही एसटी बस गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. शिवाय विठ्ठलवाडी- पाचपुतेवाडी -शिंदेवाडी येथील नागरिकांना कोणत्याही प्रकारची बससेवा नाही. त्यामुळे सदर रस्त्याची पाहणी करुन प्रवाशांच्या सोयीसाठी आणि एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी उंडाळे ते ढेबेवाडी अशी शटल बससेवा कराड आगाराने अथवा पाटण एसटी आगाराने सुरू करावी, अशी मागणी विभागातील ग्रामस्थच्यांवतीने करण्यात आली.