Breaking News

भगवंताच्या नामचिंतनाने जीवनाला धन्य बनवा-भास्करगिरी


नेवासे/प्रतिनिधी : तालुक्यातील खेडले काजळी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. भगवंताच्या नामचिंतनाने व संतसंगतीच्या माध्यमातून जीवनाला धन्य बनवा असे आवाहन श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी यावेळी बोलताना केले. 

शुक्रवारी श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली. काल्याच्या कीर्तनात त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललिलांचे वर्णन केले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला गाय ही प्रिय होती म्हणून त्यांनी गोपालनाचा संदेश दिला. त्यांच्याच कार्याचा आधार घेऊन आपण ही गोपालन करतांना गाईची सेवा करा तिचे संरक्षण करा असे अवाहन त्यांनी केले. गावकर्‍यांनी एकत्रित येऊन हा अखंड हरिनाम सप्ताहाचा सोहळा हनुमंतरायांच्या दरबारात साजरा केला. असाच एकोपा गावाच्या विकासासाठी ही ठेवा संताबद्दल आदरभाव ठेवा, जीवननौका पैलतीरावर जाण्यासाठी संत संगतीची कास धरा, नामस्मरणाच्या माध्यमातून भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.

यावेळी हभप राजेंद्र महाराज आसने, हभप विठ्ठल महाराज ढगे, हभप लिपणे महाराज, मृदुंगाचार्य दादासाहेब कोरडे, सरपंच बाळासाहेब कोरडे, रायभान कोरडे, सुदाम कोरडे पोपट मुठे, गोरख ढगे, संतोष कोरडे संपत पाठे, नारायण गायकवाड, बजरंग उदे, दिनकर उदे यांनी पारायण सोहळा यशस्वी होण्यासाठी योगदान दिले. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.