Breaking News

नेत्यांनो विकासावर बोला अन्यथा तुमची खैर नाही!


खटाव / सदानंद जगताप : सध्या लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरु झाली आहे. प्रचारासाठीची धावपळ शिगेला पोहोचलीय. आता आमचीच लगीनं घाई सुरू आहे. अशात जनतेच्या अडी-अडचणी, सामान्य जनतेवर ओढवलेले संकट याचा विचार करायला वेळ कुणाला आहे. आम्ही आमचा विचार करायचा? की, जनतेचा, असा प्रश्र्न राजकीय मंडळींकडून उपस्थित केला जात असल्याची चर्चा जनतेतून होताना दिसतेय.

उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने जनता कासावीस झाली आहे. सकाळी अकरा वाजल्यापासूनच अंगाची लाही - लाही होवू लागली आहे. त्यामुळे दुपारी बारा ते सायंकाळी चार-साडेचार वाजेपर्यंत गावा- गावातून व शहरातील रस्त्यावर अक्षरशःशुकशुकाट जाणवत आहे. त्यात ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्ह्यातील अनेक गावातून पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्र्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.
आता कुठे निवडणुकीतील प्रचारात रंग भरायला सुरवात झाली आहे. मात्र ही निवडणुक व सामान्य जनतेसमोर उभे ठाकलेले प्रश्र्न, यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीसाठीचा म्हणावा तसा उत्साह लोकांमध्ये दिसून येत नाही. गावा- गावांना राजकीय मंडळी भेटी देताहेत, सभा, कोपरासभा, जाहीर सभा होताहेत. मात्र कोणताच राजकीय नेता सर्वसामान्य जनतेच्या समस्यांवर बोलत नाही. प्रत्येक पक्षांच्या सभांमधून केवळ एकमेकांची उणी-धुनी काढणे व एकमेकावर टिका-टिप्पणी करणे याशिवाय कोणताच राजकीय पक्ष किंवा नेता बोलायला तयार नाही. 

प्रत्येकजण आम्ही किती आणि कसे चांगले आहोत, दुसर्‍या पक्षातील राजकारणी कसे भ्रष्ट, ढोंगी तसेच राजकारण करण्यास कसे नालायक आहेत, हेच लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. याला कोणताच पक्ष उपवाद नाही. जनतेसमोर उभे ठाकलेले प्रश्र्न, समस्या, लोकांच्या अडी-अडचणी व त्यावर कशा प्रकारे मार्ग काढू यावर कोणत्याच पक्षाचे राजकीय नेते-कार्यकर्ते बोलत नसल्याची चर्चा जनतेतून होत आहे.
शहरी तसेच ग्रामीण जनतेसमोर आज मितीला समस्यांचे गाठोडे खूप मोठे आहे. मात्र, याच समस्या सर्वच पक्षांनी प्रचारातून पूर्णपणे हद्दपार केल्या आहेत. त्यास समस्यांवर किंवा प्रश्नांवर कोणताच राजकीय पक्ष किंवा अपक्ष नेता सुध्दा सभेतून, कोपरासभेतून किंवा प्रचार यंत्रणेेद्वारे बोलताना दिसत नाही. सार्‍याच राजकीय मंडळीनी गांधारीची भूमिका स्विकारलेली पाहवयास मिळत आहे. सार्‍याच राजकीय मंडळीना कदाचित सर्वसामान्यांचे प्रश्र्न दिसत असावेत. परंतु, त्यांना या निवडणुकीच्या रणधुमाळीत बोलायला वेळ नाही. 

जनतेचं प्रश्र्न सोडवत बसायचे तर, आख्खी प्रशासकीय यंत्रणा जनतेचे प्रश्र्न सोडविण्यात गुंतून पडेल. मग आपल्या निवडणुकीकडे कोण लक्ष देईल, हाच प्रश्र्न यांचा जनतेसाठी काम करण्यातला मुख्य अडसर आहे. जनता व त्यांच्यापुढे निर्माण झालेले प्रश्र्न, अडीअडचणी यांच्याशी आतातरी आम्हांला काही एक देणे - घेणे नाही. सध्या आम्ही निवडून कसे येवू या व्यतिरिक्त आम्हाला कोणताच प्रश्र्न महत्वाचा वाटत नाही. असेच सर्वच राजकीय पक्षांच्या नेते मंडळीना वाटत असल्याचे, सर्वच पक्षांच्या सभा व नेत्यांच्या भाषणातून दिसत आहे.

शहरी भागात एकूण मतदार संख्येच्या पस्तीस ते चाळीस टक्केच जनता राहते. या उलट 60 ते 65 टक्के मतदार ग्रामीण भागात राहतात. नेमका ग्रामीण मतदार या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरणार आहे. ग्रामीण मतदारांपैकी बहुतांश मतदार शेती व शेतमजुरीवर अवलंबून आहेत. याच मतदारांचेच प्रश्र्न सध्या ऐरणीवर आहेत. शेतमालाला भाव नाही. शेतमालाला हमीभाव देवू, असे अभिवचन ज्या पक्षाने दिले, त्यांनीच निवडून येताच सोईस्कररित्या त्या मुद्याकडे पाठ फिरविली. शेती पाण्याचा प्रश्र्न तर गंभीर बनला आहेच. त्यातच वीज भारनियमनाचे भूत बळीराजाच्या डोक्यावर नाचत आहे. पण गेल्या तीन- चार वर्षांपासून शेतमाताचे भाव जाणीवपूर्वक पाडण्याचे काम सातत्याने होत आले आहे. त्यावर कोणत्याच राजकीय नेत्याने आवाज उठवला नाही, की प्रश्र्न सोडविण्याचा प्रयत्न सुध्दा केला नाही. शेतमजुरांचे अनेक प्रश्र्न आहेत.. पण ते सुध्दा सोडविण्याची इच्छा कुणाकडेच नाही. लोकसभेची ही निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. मात्र, आज अखेर ग्रामीण भागातील खर्‍या अडचणी व निर्माण झालेल्या समस्यांवर कोणत्याच राजकीय पक्षाचा उमदेवार बोलायला तयार नाही. प्रत्येकजण मीच उमेदवार म्हणून कसा योग्य आहे. याचीच टिमकी वाजवण्यात दंग आहे. 

लोकांच्या अडचणी व समस्यांशी यांना काही एक देणे-घेणे नसल्याची चर्चा जनता उघडपणे करीत आहे.
सध्या केवळ सातारा जिल्ह्याचा विचार करता, 145 गावे व 656 वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. पाणी नसल्याने पशूधन कसे जगवायचे असा जटील प्रश्न बळीराजाला पडला आहे. पाण्यासाठी बायका-पोरांसह सर्वजन दाही दिशा वणवण करीत आहेत. दोन लाख पंचेचाळीस नागरिक व ऐक्यान्नव हजार सहासे सदतीस हजार एवढे पशुधन हे 165 टँकरने मिळणार्‍या पाण्यावर अवलंबून आहे. हे टँकर वेळी -अवेळी केव्हाही येतात. त्यातून येणारे पाणी पिण्यायोग्य असेलच याची कोणतीच गॅरंटी नाही. तक्रार करायची म्हटले तरी कोणाकडे करायची हा खरा प्रश्र्न आहे. या राजकारण्यांनी सारी प्रशासकीय यंत्रणाच निवडणुकीच्या कामात गुंतवली आहे. त्यामुळे सामान्य जनांच्या तक्रारी ऐकाला आता कुणालाच वेळ नाही. 
 
जनतेसमोर प्रश्र्न अनेक आहेत, अनेक संकटे समोर उभी ठाकली आहेत. पण त्यावर कोणताच राजकीय पक्ष अथवा नेता भ्र शब्द काढताना दिसत नाही. वास्तविक, या राजकीय नेत्यांना जनतेच्या प्रश्नाशी काही सोयरसुतक नाही. निवडणूक आली की यांना जनता आठवत आहे. परंतु, पाच वर्षात जनता अनंत प्रश्न व समस्या बरोबर घेवून कसे जीवन कंठित आहे, याचं भान सुध्दा या नेतें मंडळींना नाही. 
 
आता विकासावर नेत्यांनी बोलावं, अन्यथा, मतं मागायला जनतेच्या दारात येवू नये. सोशिक असणारी जनता आता राजकारण्यांना दणका देण्याच्या मनस्थितीत आहे. त्यामुळे संबंधितांनी वेळीच सावध व्हावे, अन्यथा ‘घी देखा, लेकीन बडगा नही देखा...’ अशी अवस्था नेत्यांच्या वाट्याला आली तर कुणी आश्चर्य वाटून घेवू नये.