Breaking News

शेखर गोरेंच्या पाठिंब्यामुळे भाजपने माण-खटावमध्ये मारली मुसंडी


दहिवडी / योगेश गायकवाड :  स्वर्गीय सदाशिवराव पोळ यांच्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांनी गावागावांमध्ये कॉंग्रेसची सत्ता मिळवली. या राष्ट्रवादीच्या उतरत्या काळात नेतृत्व नसल्याने सैरभैर झालेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाच्या वळचणीस जाऊन बसले. त्यातच राष्ट्रवादीला शेखरभाऊंच्या रुपाने एक खमक्या नेतृत्व मिळाले. त्या संधीच सोन मात्र शेखरभाऊंनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषद, बाजारसमिती, सोसायटी येथे विकासाच्या बळावरती पूर्ण ताकदीने जयकुमार गोरेंच्या विरोधात एक हाती सत्ता मिळवली. शेखरभाऊंनी कोणतेही पद नसताना केलेली कामे जनतेची मने जिंकून गेली. अगदी अल्पवधीत केलेली काम व त्यांनी जनतेशी जोडलेली नाळ याच्यामुळे जनतेच्या शेखरभाउ गोरे गळ्यातील ताईत बनले. शेखरभाऊंनी राष्ट्रवादीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. 

शेखरभाऊंचे वाढते वर्चस्व आणि लोकप्रियता याचाच परिपाक म्हणजे राष्ट्रवादीतील वरिष्ठस्तरावरील लॉबी व राष्ट्रवादीतील कर्तव्यशून्य पुढारी व अंतर्गत कलह यांच्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचे चीज झाले नाही. रेसमधील धावता घोडा जयकुमार गोरे यांना रोखण्यासाठीच की काय म्हणून शेखरभाऊंचा वापर राष्ट्रवादीने केला अशी चर्चा माण - खटावमधील जनतेमध्ये सुरू झाली आहे. सध्या शेखरभाऊंनी राष्ट्रवादीला रामाराम ठोकून लोकसभेच्या अनुषंगाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देऊन राष्ट्रवादीला शरद पवारांच्या संवाद मेळाव्यानंतर दुसर्‍यांदा सुरंग लावला. या अगोदर असाच वापर राष्ट्रवादीने अनिल देसाई यांचा करुन घेतला मात्र देसाई यांनी माण तालुक्यात भाजपाचे कमळ फुलवून राष्ट्रवादी पक्षाला जागा दाखवून दिली. सध्या शेखरभाऊंनी भाजपच्या रणजित निंबाळकर यांना बाहेरुन पाठिंबा देऊन भविष्यातील विधानसभेची रणनीती जोरात आखली आहे. विधानपरिषदेला शेखरभाऊंना शरद पवारांनी तिकीट देऊन माण -खटावला न्याय देतात की काय अशी मानसिकता येथील लोकांची झाली होती. त्यावेळी विधानपरिषदेला विजयासाठी आवश्यक असणारे मताधिक्य असुनसुद्धा कॉंग्रे्रेसचा उमेदवार विजयी झाला. राष्ट्रवादीची मते कॉंग्रेसला गेली. त्यावेळेस राष्ट्रवादीने नेहमीप्रमाणे प्रामाणिक कर्यकर्त्याला गाजर दाखवून माण-खटावच्या जनतेला राष्ट्रवादीने चिंतेत पाडले. आतापर्यंत माण-खटावला स्थानिक चांगले नेतृत्व मिळू दिले नाही. त्याला वरीलप्रमाणे खोडा घातला जातो, हे एक उदाहरण आहे.

माण-खटावला स्थानिक उमेदवार हा लोकसभेचा जवळचा झाला नाही. सर्व सोलापूर -बारामती वरून गाजराच्या पुंग्या वाजवल्या गेल्या. येथील जनता खासदार म्हणून उमेदवार माहित नसल्याने नरेंद्र मोदीचे नाव घेत आहेत. शेखरभाऊंच्या रूपाने माण -खटाववासियांना विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
माणमधील अगदी कळीचा आणि जिव्हाळ्याचा पाणी प्रश्र्न, जो उमेदवार मिटवेल तोच उमेदवार दिल्लीत किंवा महाराष्ट्रात पुन्हा दिसेल. देशात सर्वात जास्त आजपर्यंत सत्ता राष्ट्रवादीला देऊनसुध्दा पाणी प्रश्र्न मिटला नाही. तो बारामतीमधून निखर्‍यासारखा फुलवत ठेवला. यावरती बरीच वर्षे पोळ्या भाजून खाल्या. येथील जनतेला कोण पिट खात आहे, हेच समजत नव्हते. सध्या मात्र माण खटाव जनतेतून बारामतीकरांविषयी प्रचंड आक्रोश आहे. कारण शाश्र्वत कोणतं कामही केल नाही, आणि येथील नेतृत्व मोठे होऊ दिले नाही. शेखर गोरे यांचे नेतृत्व मोठं झालं असतं तर पाणी प्रश्र्न मिटला असता हे ओळखूनच शेखर गोरेंच्या विरोधात डावपेच करण्यात आला. येथे इतकी वर्षे इतर पक्षाला सत्ता दिली असती तर हिमालयातून पाणी आले असते, ही भावना जनतेच्या मनात घर करुन गेली आहे. येथील विकास व पाणी प्रश्र्न पूर्ण सुटायचा असेल तर एका चांगल्या शाश्र्वत विकासाच्या शोधात माणवासीय जनता आहे. 

याच विकासाच्या मुद्दावर शेखरभाऊंनी राष्ट्रवादीशी बंड पुकारुन जनतेच्या मागणीला साद देत माण -खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी संपवण्याचा चंग बांधला आहे. शेखर भाऊंची वैयक्तिक यंत्रणा युद्ध पातळीवर काम करताना दिसून येत आहे. साधारणपणे 50 गाड्या शेखरभाऊंच्या फोटोसह फिरताना दिसत आहेत. यामुळे भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते उत्साहित झालेले दिसून येत आहे.