Breaking News

मुख्यमंत्र्यांना प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी दाखविले काळे झेंडे


अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भरसभेत काळे झेंडे दाखविण्यात आल्याची घटना घडली आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सभेच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. फडणवीस महायुतीचे उमेदवार आनंदराव आडसूळ यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते. तेव्हा काही प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. 

काळे झेंडे दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना चर्चेसाठी लगेच बोलावलं मात्र शेतकरी काहीच ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. अखेर पोलिसांनी सात आठ शेतकर्‍यांना अटक केली. लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आनंदराव आडसूळ यांच्या प्रचासाराठी परतवाडा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत जेव्हा फडणवीस सभेला संबोधित करण्यासाठी व्यासपीठावर आले, तेव्हा काही लोकांनी फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले. हा प्रकार पाहून सभेतील लोकांनी ’मोदी. मोदी’ असा जयघोष सुरू केला. हा सर्व प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर घडत होता. तेव्हा फडणवीस यांनी उपस्थितांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, गोंधळ वाढत गेला. त्यामुळे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रविण पोटे यांनी मंचावरून खाली उतरुन परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर मुख्यमंत्री यांनी 1तास सभेला सँबोधित केले.