Breaking News

डॉ. देशमुख व सहकारी करणार आघाडीचा प्रचार


वडूज / प्रतिनिधी : राष्ट्रवादी कॉंग्रेसने आजपर्यंत केलेल्या अन्यायाला निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकविण्यासाठी एका बाजूला आ. जयकुमार गोरे यांनी चंग बांधला आहे, तर दुसर्‍या बाजूला त्यांच्याच पक्षाच्या खटाव व माण तालुक्याच्या दोन्ही अध्यक्षांनी आमदारांच्या फतव्याला ठेंगा दाखवत आघाडी धर्माचे पालन करणार असल्याची भूमिका पत्रकार परिषदेत जाहीर केली.

वडूज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे यांच्या निवासस्थानी याबाबतची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी श्री. गोडसे यांच्यासह तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, माणचे तालुकाध्यक्ष एम.के. भोसले, उपनगराध्यक्ष विपूल गोडसे, ऍड. दिलीपराव शिंदे, माजी सरपंच अर्जुन गोडसे, दिनकर घार्गे, दिपक गोडसे, ऍड.संतोष भोसले, पै. रणजित देशमुख, पृथ्वीराज देशमुख, संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना श्री. गोडसे म्हणाले, खटाव तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते गेली 40 ते 50 वर्षे कॉंग्रेस बरोबर कायम आहेत. लोकसभा निवडणूकीतील माढा लोकसभा मतदार संघातील भुमिकेसंदर्भात आम्ही तालुक्यातील कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना भेटलो त्यावेळी कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार आम्ही तालुक्यातील सर्व कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते आघाडी धर्माचे एकनिष्ठपणे पालन करून आघाडीचे उमेदवार संजय शिंदे यांना चांगल्या मताधिक्क्‌यांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू.

डॉ. देशमुख म्हणाले, राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी तळागाळातील ते राष्ट्रीय मुद्द्यांपर्यंत भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभीमानी शेतकरी संघटना, पिपल्स रिपब्लीकन पार्टी (कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची महाआघाडी झाली आहे. माढा लोकसभा मतदार संघातील खटाव तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळण्याची भूमिका घेतली आहे. 

श्री. भोसले यांनी या भुमिकेचे स्वागत केले. यावेळी ऍड. भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले. माजी सरपंच श्री. गोडसे यांनी प्रास्ताविक केले. अनिल कचरे यांनी आभार मानले.