Breaking News

आमचे विचार न पटणारे देशद्रोही नाहीत;लालकृष्ण अडवाणींचा भाजपला घरचा आहेर


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत तिकीट कापण्यात आलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे भीष्म पितामह आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी पहिल्यांदाच आपल्या ब्लॉगवरून पक्षाच्या सध्याच्या कार्यपध्दतीवर टीका केली आहे. भाजपने राजकीय विरोधकांना कधीच दुश्मन मानले नाहीत. जे आमच्याशी सहमत नाहीत, त्यांना देशद्रोही कधीच म्हणालो नाही, असे नमूद करून त्यांनी भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत.

भाजपच्या स्थापना दिवसाच्या पार्श्‍वभुमीवर अडवाणी यांनी एक ब्लॉग लिहिला आहे, यामध्ये त्यांनी भाजप नेतृत्वाला खडे बोल सुनावले आहे. तिकीट नाकारल्यानंतर अडवाणी यांनी आपल्या वेदना ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. भाजप 6 एप्रिलला स्थापना दिवस साजरा करेल. हा क्षण भाजपमध्ये सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. आम्ही थोडे मागे पाहिले पाहिजे, पुढे पाहताना आजूबाजूलाही पाहिले पाहिजे. भाजपच्या संस्थापक असणार्‍यांपैकी एक मी पण होतो. या भूमिकेतून देशातील जनतेशी अनुभव कथन करणे कर्तव्य समजले. पक्षासह या सर्वांनी मला स्नेह आणि सन्मान दिला असल्याचे त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.


अडवाणी यांनी गांधीनगर येथील जनतेचे विषेश आभार मानले आहेत. अडवाणी हे गांधीनगर लोकसभा मतदार संघातून तब्बल 6 वेळा निवडून गेले आहेत. यावेळी या जागेवरून भाजप अध्यक्ष अमित शाह निवडणूक लढवणार आहेत.आपण वयाच्या 14व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रवेश केला. तेव्हा आपण 70 दशकांपर्यंत प्रथम भारतीय जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाचे संस्थापक सदस्य म्हणून राजकारणाशी जुळलेले होतो. यावेळी मी अनेक दिग्गज नेत्यांच्या संपर्कात आलो. त्यामध्ये दीनदयाल उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी आणि अनेक नेत्यांचा सहवास आपणाला लाभला, असे अडवाणी यांनी म्हटले आहे.राजकारणात असताना आपण राष्ट्र प्रथम, पक्ष दुसरा आणि स्वतःला शेवटी प्राधान्य दिले आहे. या सर्व मुल्यांसाठी आपण पक्षाच्या मुल्यांशी जुळून राहण्याचा पूर्ण प्रयत्न केला, असेही अडवाणी यांनी म्हटले आहे.लोकशाहीचा सुगंध विविधतेमध्ये आहे. भाजपने आपल्या राजकीय विरोधकांना आरंभीपासूनच म्हणून कधीच संबोधले नाही. तसेच राष्ट्रवादाबद्दलही आम्ही समजतो. राजकीय दृष्ट्या आमच्याशी सहमत नसलेल्यांना आम्ही कधीच राष्ट्रविरोधी संबोधले नाही, असे स्पष्टीकरणही अडवाणी यांनी आपल्या लेखाच्या माध्यमातून दिले आहे.