Breaking News

काँग्रेस संपली, की गरिबीही संपेल; मोदी यांचा काँग्रेसवर घणाघात; ‘काँग्रेस हटाव’चा सूर पुन्हा आळवलाभुवनेश्‍वरः देशातील गरिबी संपवायची असेल, तर त्यासाठी‘काँग्रेस हटाव’ या एकाच जडीबुटीचा वापर करावा लागेल. एकदा या देशातील काँग्रेस संपली, की गरिबी आपोआप संपेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघात केला.


सोनपूर येथील प्रचारसभेत मोदी यांनी आज काँग्रेस आणि बिजू जनता दलवर खरमरीत टीका केली. ओडिशातील लोकांनी ज्या राज्यकर्त्यांना निवडून दिले, त्यांना कधी काम करायचेच नव्हते. त्यामुळेच ओडिशा दिवसेंदिवस अधिक मागास होतो आहे, अशी टीका त्यांनी व्यक्त केली आहे. ‘इतके वर्ष केंद्रात सत्तेत कोण होते? ओडिशा राज्यात सत्तेत कोण होते? ओडिशाकडे इतर राज्यांच्या तुलनेत जास्त नैसर्गिक संसाधने असूनसुद्धा ओडिशा मागे कुणामुळे राहिला? तुमची गरिबी संपावी अशी, काँग्रेस आणि बिजू जनता दलची इच्छाच नाही, असे ते म्हणाले.
काँग्रेस, बिजू जनता दलावर टीका करण्यासोबतच मोदी यांनी केंद्रतील भाजप सरकारच्या चांगल्या कामांचा पाढाही वाचला. ओडिशाचा मला अभिमान आहे. आज केंद्राच्या प्रयत्नांमुळे ओडिशातील घरोघरी वीज पोहोचली आहे. गरिबांना गॅस सिलेंडर आणि मोफत रेशन मिळाले आहे. म्हणूनच विरोधक बिथरले आहेत. मोदी विरोधात सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. तेव्हा आता निर्णय तुमचा आहे. तुम्हाला महामिलावटचे मजबूर सरकार हवे आहे की मजबूत सरकार हवे, असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला.


राज्य आणि केंद्रात एकाकडे सत्ता द्या

ओडिशाचा विकास करायचा असेल तर राज्यात ही सत्तांतर होणे गरजेचे आहे. राज्याचा सर्वांगीण विकास करेल असे सरकार तुम्ही निवडून द्या, असे आवाहन मोदी यांनी स्थानिकांना केले. लोकसभा निवडणुकांसोबत ओडिशामध्ये विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. ‘ केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाची सत्ता असेल, तेव्हा विकासाला वेग येईल आणि राज्याची परिस्थिती सुधारेल.’ असे मोदी यांनी सांगितले.