Breaking News

निवडणूक आयोगाचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर राहुल द्रविड मुकणार मतदानाला


बंगळुरू : भारताचा माजी दिग्गज फलंदाज आणि ’द वॉल’ म्हणून प्रसिध्द असलेला राहुल द्रविड बंगळुरूत 18 एप्रिलला होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करु शकणार नाही. द्रविडचे नाव मतदार यादीत नसल्याने तो यावेळी मतदानापासून वंचित राहणार आहे. द्रविड हा कर्नाटक निवडणूक आयोगाचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर असून तोच मतदानापासून वंचित राहणार असल्याने संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. 

कर्नाटकमध्ये 18 एप्रिलला लोकसभा मतदान होणार आहे. परंतु, राहुल द्रविड यावर्षी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करु शकणार नाही. राहुल द्रविड आणि त्याच्या पत्नी इंदिरानगर येथून आरएमवी एक्सटेंशन येथे शिफ्ट झाले आहेत. घर बदलल्यानंतर त्यांनी इंदिरानगर येथील मतदारांच्या यादीतून आपले नाव वगळण्यात यावा, असा अर्ज दाखल केला होता. त्यामुळे इंदिरानगरच्या मतदारांच्या यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले. आरएमवी एक्सटेंशन येथे राहायला आल्यावर त्यांनी त्या पत्त्यावरुन मतदानाचा अर्ज भरला नाही. त्यामुळे त्यांचे नाव मतदारांच्या यादीमध्ये आलेले नाही. यासंदर्भात डोम्लूर सब डिव्हिजनचे अधिकारी बासावराजू मागी यांनी सांगितले की, ‘द्रविड यांचे भाऊ विजय यांनी राहुल आणि त्यांच्या पत्नीचे नाव मतदार यादीतून काढण्याचा अर्ज दाखल केला होता. 

मतदार यादीतून त्यांचे नाव बदलल्यानंतर राहुल यांनी यादीत नाव सामावून घेण्यासाठी फॉर्म 6 भरला नाही.’ तर माथीकेर सब डिव्हिजनचे अधिकारी रुपा यांनी सांगितले की, ‘मतदार यादीत नाव सामिल करण्याच्या मोहिमेअंतर्गत आमचे काही अधिकारी राहुल द्रविड यांच्या घरी गेले. मात्र, त्यांना घरात एंट्री दिली गेली नाही. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले होते की, राहुल द्रविड सध्या विदेशात आहेत. त्यांनी मतदार यादीत नाव सामिल करण्याचे कोणतेही संदेश पाठवलेले नाही.’ यानंतर विदेशातून आल्यानंतर राहुल द्रविड यांनी निवडणूक अधिकारी बासावराजू यांना आपले नाव इंदिरानगर मतदार यादीत सामील करता येईल का? असे विचारले होते.