Breaking News

जेट एअरवेजच्या कर्मचार्‍यांची मोदींना मदतीची हाक


मुंबई : आर्थिक डबघाईला आलेल्या जेट एअरवेजच्या बाबत अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नसल्याने सोमवारपासून जेटच्या 1100 वैमानिकांनी विमान न उडविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सोमवारी मुंबईत जेट एअरवेज व एसबीआय यांच्यात महत्त्वाची बैठक घेण्यात आली, त्यामुळे वैमानिकांनी आपले आंदोलन तूर्तास मागे घेतले आहे. 

या बैठकीत जेट एअरवेजच्या 20 हजार कर्मचार्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदतीची हाक दिली आहे.
मुंबईतील अंधेरी परिसरातील जेट एअरवेज कार्यालयाबाहेर शेकडो जेट एअरवेजचे कर्मचारी जमले आहेत. जेट एअरवेजच्या अभियंता, पायलट व इतर कर्मचार्‍यांना जानेवारी 2019 पासून मासिक वेतन मिळालेले नाही. त्यामुळे ‘नॅशनल एविटर्स गिल्ड’ने या संदर्भात ’वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. आर्थिक डबघाईला आलेल्या जेट एअरवेजच्या बाबत अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. यामुळे सोमवारी दिवसभरात जेट एअरवेजची केवळ 7 विमाने उडाली आहेत.

जेट एअरवेज या कंपनीवर 800 कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कंपनीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे या कंपनीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी पगारसाठी आंदोलन केले होते. वेतन नाही तर काम नाही, असा पवित्रा कंपनीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी घेतला आहे. मात्र, सोमवारी कंपनीच्या कर्मचार्‍यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले आहे. कारण सोमवारी जेट एअरवेजचे मालक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. 

स्टेट बँकने आतापर्यंत जेट एअरवेजला 1500 कोटी रुपयांच्या रिलीफ फंडपैकी 200 कोटी रुपये कर्ज दिले आहे. या रिलीफ फंडमधली आणखी रक्कम जेट एअरवेजला मिळावी म्हणून आज ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. बँकेने ही रक्कम दिली तर कर्मचार्‍यांना त्यांचा थकलेला पगार मिळणार आहे. याशिवाय त्यांना कामावर पुन्हा रुजू होता येणार आहे. आपली नोकरी वाचावी, यासाठी जेट एअरवेजच्या सर्व कर्मचार्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदतीची हाक दिली आहे. 20 हजार लोकांच्या नोकरीसाठी मोदीजी मदत करा, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. त्यामुळे मोदी या कर्मचार्‍यांच्या मदतीला धावून येतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.