Breaking News

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारख्या इतर मित्रपक्षांची आघाडी झाली आहे.


सातारा: राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारख्या इतर मित्रपक्षांची आघाडी झाली आहे. मात्र, आतापर्यंत स्थानिक पातळीवरील जिल्हा परिषद, पंचायत समिती एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसचा सूर कधीही जुळला नाही. 

त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीसाठी पक्षातील वरिष्ठांनी आघाडी केली असली तरी स्थानिक पातळीवरील नेते व कार्यकर्त्यांच्या पचनी हा निर्णय कितपत पडेल अशी शंका अगोदरपासूनच होती. आता राज्यात सुरु असलेला आघाडीचा प्रचार पाहता अनेक ठिकाणी राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये धुसफूस पहायला मिळत आहे. भाजप-शिवसेनेच्या युतीत अशी धूसफूस नाही, असे मुळीच म्हणता येत नाही. तिथेही पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होतच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने ही आघाडी झाली आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. परंतु, आघाडी झाल्यानंतर दोन्ही पक्षांतर्गंत कुरबुरीची सर्वात जास्त झळ राष्ट्रवादीलाच बसण्याची शक्यता अधिक दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी व काँग्रेसमधली कुरबूर आता लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान जाहीररित्या चव्हाट्यावर आली आहे. वास्तविक, एकेकाळी सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. सध्यस्थिती पाहता काँग्रेसची मोठी वाताहत झालेली दिसत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणचे आमदार जयकुमार गोरे आणि माजी आमदार आनंदराव पाटील आणि माजी आमदार उंडाळकर चौघांव्यतिरिक्त काँग्रेसचा कुणीही नेता काँग्रेसमध्ये राहिला नाही. वाईचे माजी आमदार मदनदादा भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपकडून माढा मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. उंडाळकर यावेळी राजकारणात फारसे सक्रिय आहेत, असे म्हणता येणार नाही.

 ही स्थिती पाहता काँग्रेसचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. कॅप्टन नसल्याने सैरभैर झालेल्या सैनिकांसारखी अवस्था काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची झाली आहे. आतापर्यंत स्थानिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसला अडचणीत आणण्याचे काम केलं आहे. मग आता लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांच्याबरोबर कसे काय रहायचे, असा सवाल काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करणार नाही, असा पवित्रा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याने राष्ट्रवादीची पंचाईत झाली आहे. परिणामी, सातारा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमदेवारासाठी ही चिंताजनक बाब बनली आहे.