Breaking News

तांबवेच्या भैरवनाथाची यात्रा भक्तीभावात
पंचक्रोशीसह सांगली व कर्नाटकातील भाविकांचे श्रध्दास्थान
कराड / प्रतिनिधी : तांबवे (ता.कराड) येथून सहा किलोमीटर अंतरावर पाठरवाडी डोंगरावर वसलेले भैरवनाथ देवस्थान हे तांबवे पंचक्रोशीसह सांगली व कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या श्री. भैरवनाथाची यात्रा गुढीपाडव्याच्या दुसर्‍या दिवशी सायंकाळी भरण्यास सुरूवात होवून तिसर्‍या दिवशी पहाटे भैरोबाच्या नावानं चागंभलं म्हणत गुलाल खोबर्‍यांची उधळण केली जाते.
भैरवनाथ देवाची यात्रा दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते. तांबवे गावासह परिसरातील 10 ते 12 गावातील लोक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होत असतात. या पंचक्रोशीतील कामानिमित्त बाहेरगावी असणारा वर्ग आपल्या कुटुंबासह या यात्रेला हजेरी लावत असतो. गुढीपाडव्याच्या दिवशी तांबवे गावातील मातंग समाजाची मानाची सासन काठीचे पूजन करून तांबवे गावातून सवाद्य मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत गावातील अबालवृध्द सहभागी होतात. नंतर रात्री सासनकाठीचा मुक्काम हा गावातील श्री जोतिर्लिंग मंदिरात असतो.
गुढीपाडव्याच्या दुसर्‍या दिवशी तांबवे गावातून सासनकाठीचे प्रस्थान पाठरवाडी डोंगराकडे होते, या पाठरवाडीवरती तांबवे, वाटेगांवसह अनेक गावच्या सासनकाठ्या दाखल होतात. यात्रेच्या आदल्या दिवशी सायंकाळपासूनच परगावचे व स्थानिक भाविक मुक्कामी डोंगरावरती हजेरी लावतात. येथे मुक्कामी येणार्‍या भाविकांसाठी प्रशासन व भागातील सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच मुंबई रहिवाशी मित्र परिवारातर्फे सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. श्री. वसंतराव वामनराव पाटील व श्री. विशाल वामनराव पाटील यांचे मार्फत कै. विमल पाटील यांच्या स्मरणार्थ गेल्या 18 वर्षापासून सायंकाळी मुक्कामी येणार्‍या भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यात्रेच्या मुख्य दिवशी भैरवनाथ मुंबई रहिवाशी मित्रमंडळाकडून डोंगराच्या पायथ्याला गमेवाडी येथे महाप्रसाद दिला जातो.
यात्रेच्या अगोदर भैरवनाथ मंदिरात ज्ञानेश्र्वरी पारायण आयोजित केले जाते. याकाळात प्रवचन व किर्तने होतात. यात्रेला रात्रभर मंदिर परिसरात दांडपट्टा, हलगी वादन व मर्दानी खेळ खेळले जातात. यावेळी रात्रीचे भाविक फटाक्यांची अतिषबाजी करत असतात, त्यामुळे मंदिर परिसर अतिषबाजीने उजाळून निघालेला पहायला मिळत असतो. पहाटे चार पाच वाजता तांबवे पंचक्रोशीतील लोक डोंगर चढू लागतात. पहाटे देवाची पूजा करून आरती झाल्यानंतर भैरवनाथाची पालखी पहाटे 6 वाजता मंदिरातून बाहेर गुलाल खोबर्‍यांची उधळण करण्यासाठी आणली जाते. यावेळी भाविक एकच जल्लोष करत, भैरोबाच्या नावानं चागंभलं म्हणत असतात.
यावेळी सासनकाठ्या आणि देवाची पालखी यांची भेट घेतली जाते. त्यानंतर पालखी व सासनकाठ्या मंदिराच्या चारीबाजूंनी जयघोष करत भक्तिमय वातावरणात यात्रा संपन्न होते. या यात्रेत सर्व जाती- धर्माचे लोक, महिला, युवक सहभागी होतात. भैरवनाथ देवाच्य यात्रेनंतर परिसरातील यात्रांना सुरूवात होते.