Breaking News

छत्रपतींच्या गादीचा मान राखा : श्रीमंत कोकाटे


सातारा/ प्रतिनिधी : लोकशाही पद्धतीने होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत जे आक्षेपार्ह विधान केले आहे ते अत्यंत बेजबाबदार असून नरेंद्र पाटलांनी छत्रपतींचा गादीचा मान राखावा, सातार्‍याची जनता हे कदापि सहन करणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, भाजपाने लोकशाही मुल्यांना पायदळी तुडवले असून या लोकशाही विरोधी पक्षाच्या उमेदवाराला सक्षम पर्याय असलेल्या उमेदवारालाच मतदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याबाबत आपली भूमिका मांडताना कोकाटे म्हणाले, भाजपाकडून देशाला धोका आहे. सध्या देशातील न्यायव्यवस्था, सीबीआय, आरबीआयही धोक्यात आहे. सीबीआयच्या सर्वोच्च अधिकार्‍याची बदली रात्री दीड वाजता एका मेसेजवर होते.आरबीआयचे रघुरामण आणि उर्जित पटेल यांनी दिलेले राजीनामे हे त्याचेच द्योतक आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगाचा दौरा करतात त्यासाठी खर्च 2 हजार कोटी रुपये आहे. मात्र ज्या देशात त्यांनी दौरे केले त्यापैकी कुणीही भारतात गुंतवणूक केलेली नाही. 

जातीयवादी पक्ष असलेल्या भाजपाने नयनतारा सहगल या लेखिकेला एका संमेलनाचे अध्यक्षपद दिले आणि काही दिवसातच ते रद्दही केले. आयुब राणा पत्रकार असलेल्या महिलेने एक पुस्तक लिहिले असून यामध्ये मोदी आणि शाह या दोघांनी मिळून गुजरात मधील दंगली घडवून आणल्याचा गौप्यस्फोट केला आहे. याप्रकरणी अमित शाह हे तडीपार असल्याचेही कोकाटे यांनी सांगितले.

भाजपाचे एक मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी आम्ही संविधान बदलणार आहोत असे वक्तव्य करुनही अद्याप त्यांच्यावर काहीही कारवाई केलेली नाही. भारतात साखरेचे उत्पादन होत असतानाही या सरकारने पाकीस्तानकडून साखर आयात केली आहे तसेच इजिप्तहून कांदा आयात केला आहे. तूरडाळ आणि गहूही परदेशातून आयात करुन या सरकारने देशातील शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. ज्या अंबानीने साधे कागदाचे विमान बनवले नाही त्याला राफेल हे विमान बनवण्याचे कंत्राट दिले गेले आहे. 

बाबासाहेब पुरंदरे, मनोहर भिडे हे लोकशाहीला धोकादायक आहेत. बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण व भारतरत्न पदवी देणार्‍या या सरकारच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आहेच. 

सातार्‍यात राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले हे भाजपाच्या उमेदवाराला रोखण्यासाठी सक्षम उमेदवार असल्याने आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. यावेळी संदीप माने, दीपक पाटील, जोतीराम वाघ, सावकार काटे, दस्तगीर मुलाणी यांची उपस्थिती होती.