Breaking News

म्हसवड शहरात आढळले बेवारस नवजात अर्भकम्हसवड / प्रतिनिधी : म्हसवड शहरातील ज्ञानवर्धिनी विद्यालयाच्या पाठीमागील बाजुस असलेल्या काटेरी झुटुपांत एक नवजात अर्भक आढळुन आल्याने शहरात एकच खळबळ उडाली असुन त्या गोंडस व निरागस अर्भकाकडे पाहून कोण ती निर्दयी माता असावी याबाबत नागरीकांतून उलट- सुलट चर्चा सुरु आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, येथील ज्ञानवर्धनी विद्यालयाच्या पाठीमागील बाजुस ओढा असुन त्या ओढ्याच्या बाजुला मोठ्या प्रमाणावर काटेरी वनस्पती उगवलेली आहे. त्यामुळे याठिकाणी शक्यतो कोणीही फिरकत नाही, याचाच फायदा घेत या निर्जन असलेल्या ठिकाणी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पुरुष जातीचे एक दिवसाचे नवजात अर्भक आणुन टाकले होते, ज्या व्यक्तीने सदरचे अर्भक याठिकाणी टाकले आहे ती व्यक्ती अत्यंत निर्दयी असण्याची शक्यता असून त्याने निर्दर्यपणे या अर्भकास लांबूनच याठिकाणी टाकले असल्याने त्या अर्भकाच्या अंगात काटे घुसल्याचे प्रथमदर्शनींचे म्हणणे आहे.

याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास म्हसवड शहरातील काही नागरिकांनी फोन करुन पोलीस स्टेशनला कळवले की ज्ञानवर्धिनी हायस्कूल शाळा म्हसवड येथील बायपास रोड येथे काटेरी बाभळीच्या झाडामध्ये एक अज्ञात बालक कोणीतरी टाकलेले आहे, अशी माहिती मिळताच सपोनि देशमुख, कॉन्स्टेबल जगताप, सानप सहा.फौजदार पायमल, हवालदार देशमाने यांनी घटनास्थळी जाऊन नवजात बालकास ताब्यात घेतले. त्यास पोलिसांच्या मदतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून त्याची तपासणी करुन त्याच्यावर योग्य ते औषधोपचार केल्यावर त्यास पुढील उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात 108 या रुग्णवाहिकेने पाठवण्यात आले.