Breaking News

खटावसह माण तालुक्यात कुपनलिकांच्या कामाला वेग; दुष्काळ सद्दष्य परीस्थिती,उन्हाळी पिके जगाविण्यासाठी अखेरची धडपड


खटाव / सदानंद जगताप : स्वातंत्‌रय पुर्वकाळापासुन खटाव, माण तालुक्याची गणना दुष्काळी तालुक्यात केली जात आहे. इकडे मान्सूनचा मौसमी पाऊस पोहचतच नाही. सर्व काही वळवाच्या पावसाच्या भरोषावर. मात्र चालु वर्षी गत काही वर्षांच्या तुलनेत जो काही पाऊस झाला तो अत्यल्पच झाला. परिणामी, माण, खटावची जीवनदायनी माणगंगा व वेदावती (येरळा) नद्या पूर्ण वर्षभरात चार- दोन दिवस दुथडी भरून वाहिल्याच नाहीत. याचाच परिणाम म्हणून माण-खटाव तालुक्यात पाणीसाठे अर्धवट झालेत, हे पाहूनच प्रशासनाने ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होणार हे लक्षात घेवून योग्य नियोजन तेव्हापासूनच केलं असतं तर आजचा पिण्याच्या व शेती पाण्याचा प्रश्र्न निर्माण झाला नसता. पदरी असलेले पशुधन शेतात उभे असलेले पीक व पिण्याच्या पाण्याची सोय युध्द पातळीवर करण्यासाठी उदासिन राजकारणी व नाकर्त्या प्रशासनामुळे, कुपनलिका घेण्याशिवाय शेतकर्‍याना आता पर्यायच उरला नाही, अशी चर्चा माण- खटावच्या जनतेनुन होत आहे .

पण गेंड्याचे कातडे पांघरलेले प्रशासन वेळीच जागे होईल तर ते प्रशासन कसले? येथील शेतकर्‍यानी उपलब्ध पाणी पाहून खरीप हंगाम कसाबसा पार पाडला. मात्र खब्बी हंगामाचे वेळी तर पावसाने कुठे अत्यल्प तर कुठे दांडीच मारली. त्यामुळे पाणीसाठा अपूर्ण दिसत असला तरी कशीबशी रब्बी पिकांची फेरणी केली. पुरेल तोवर पिकाना पाणी दिले. अपुर्‍या पाण्यामुळे हंगाम पार पडला खरा, पण उत्पन्नात फार मोठी घट निर्माण झाली. खरे तर पाण्याअभावीच रब्बी हंगामात घट आली. हे शासन दरबारी लक्षातही आले होते. खरे तर त्याच वेळी पुढे सुरु होणार्‍या उन्हाळ्याची दाहकता लक्षात घेवून नियोजन करणे गरजेचे होते. पण वेळीच जागे होईल ते प्रशासन कसले? उपलब्ध पाणी साठे पूर्ण आटले, विहिरींनी तर केव्हाच तळ गाठला होता. जनतेतून पाण्याची टोहो फोडला जावू लागला. मग प्रशासन जागे झाले. गावो- गावी, वाडया, वस्त्यावर टँकरनेे पाणी पुरवठा सुरु केला. खरा पण टँकर वेळेवर येईल याची गॅरंटी नाही. पुरेसे पाणी मिळेल हेही आशा नाही. दिवसभर पाण्यासाठी वाट पहात थांबणे किंवा चार -दोन मैलाची पायपीट करणे याशिवाय पर्यायच उरला नाही.
वाढती उन्हाची तीव्रता, कोरडे पडलेले पाणी साठे, विहिरींनी गाठलेला तळ, परिणामी निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई त्यामुळे शिवारात असलेली पिके पाण्याअभावी सुकून चालली आहेत. पदरी असलेली जनावरे पाण्याविना धडपडू लागली आहेत. पिके व पदरी असलेले पशुधन वाचविण्यासाठी अखेरचा उपाय म्हणून पदरमोड अथवा प्रसंगी उसणवारी किंवा कर्ज घेवून खटाव, माणच्या शेतकर्‍यांनी कुपनलिका खुदाई सुरु केल्याचे मोठया प्रमाणावर दिसत आहे.खटाव - माण तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाई सुरू आहे. कित्येक गावांना व वाडयाःवस्त्यांवर टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. टँकर वेळेवर व नियमित येतील याची कोणतीही हमी नाही. त्यामुळे दिवस-दिवस पाण्याच्या टँकरची वाट पाहण्याशिवाय येथील जनतेला पर्यायच उरला नाही. काही गावातील लोक टँकरअभावी मैलोनमैल पायपीठ करून पिण्याचे पाणी उपलब्ध करीत गरज भागवताना दिसत आहेत.

खटाव व माण तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने काही ठिकाणी शेतकरी फळबागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करीत आहेत. वाढती उन्हाची तीव्रता व पिकांची पाण्याची गरज पाहता तोही प्रयत्न अपुराच पडत आहे.पिके व पदरी असलेले पशुधन वाचविण्यासाठी, पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने आता भूगभागातील पाणी मिळविण्याची शेतकर्‍यांची धडपड सुरु आहे. दोन्हीही तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकरी वर्ग पुर्णत: अडचणीत आला असतानादेखील या जीवनमरणाच्या लढाईत तो परिस्थितीशी लढतोय. त्यासाठी दुष्काळजन्य परिस्थितीने पुरता बेजार झालेला असताना देखील केवळ जगण्यासाठी, कसेतरी उधार -उसनवारी करून किंवा ज्यांना शक्य आहे ते पदरमोड करून आपापल्या शेतात कुपनलिका खोदून पाण्याचा शोध घेवू लागले आहेत.

कठीण परिस्थितीत शेतात आज अखेर जगविलेली पिके, पाण्याअभावी सुकून जावू लागली आहेत. शासनककर्ते अथवा प्रशासन आपल्यासाठी काहीतरी करेल. यावर माण- खटावच्या जनतेचा विश्र्वासच उरला नाही. म्हणूनच केवळ नाईलाजास्तव कर्जबाजारी होवून का होईना, कुपनलिका खुदाईच्या कामाला जोर आल्याचे चित्र माण- खटाव तालुक्यात सर्वत्र दिसत आहे.