Breaking News

थरूर यांनी अनुभवले आगळे दाक्षिण्य!



तिरुवअनंतपूरम : मल्याळम नववर्षाच्या निमित्ताने केरळच्या तिरुवअनंतपूरम येथील गांधारी अम्मन मंदिरात तुलाभरमसाठी काँग्रेस नेते शशी थरूर उपस्थित राहिले होते. त्याचवेळी ‘तुलाभरम’ म्हणजेच तुला करतेवेळी घडलल्या एका दुर्घटनेत थरूर यांच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यामुळे थरूर अतिशय भावुक झाले.

‘सोशल मीडिया’वर शशी थरूर यांनी रुग्णालयातील फोटोही पोस्ट केले, ज्यामध्ये त्यांच्या डोक्याला फार दुखापत झाल्याचे दिसते. रुग्णालयात दाखल केल्यामुळे थरूर यांच्या समर्थकांमध्येही या दुर्घटनेनंतर चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले. या सार्‍यामध्ये सुरक्षा मंत्री निर्मला सीतारामण यासुद्धा थरूर यांच्या भेटीला गेल्या. निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असताना व्यग्र वेळापत्रकातूनही सीतारामण यांनी थरूर यांची थेट रुग्णालयात जाऊन भेट घेतली. जे पाहून खुद्द थरूरही भावुक झाले.

‘सोशल मीडिया’वर त्यांनी या भेटीचा फोटो पोस्ट करत त्यासोबतच्या कॅप्शनमध्येही त्यांनी या भेटीविषयीच्या भावना व्यक्त केल्या. सीतारामण यांच्या या वागण्याने माझे मन भरून आले. निवडणूक प्रचाराच्या या व्यग्र वेळापत्रकातही त्यांनी आज सकाळी माझी भेट घेतली. भारतीय राजकारणात अशा प्रकारचे दाक्षिण्य पाहायला मिळणे ही अत्यंत दुर्मिळ बाब आहे’, असे त्यांनी लिहिले आहे.

तिरुवअनंतपूरम येथील एका मंदिरात झालेल्या या दुर्घटनेमध्ये थरूर यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यामुळे आता ऐन प्रचाराच्याच दिवसांमध्ये समोर आलेली ही अडचण दूर करण्यासाठी आणि पुन्हा प्रचारासाठी स्थानिकांमध्ये येण्यासाठी थरूर कोणती युक्ती लढवतात, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. शशी थरूर तिरुवअनंतपूरम येथील मतदार संघातून काँग्रेसच्या वतीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उभे राहिले आहेत. यापूर्वी ते या मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यामुळे आता तिसर्‍यांदाही ते विजयी पताका उंचावत मतदारांच्या मनात असणारे त्यांचे स्थान कायम राखण्यात यशस्वी होणार का, याकडेच राजकीय वर्तुळातील अनेकांचे लक्ष लागले आहे.