Breaking News

खर्डा चौकात 'चक्का जाम' अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी


जामखेड /प्रतिनिधी: शहरातील खर्डा चौकातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या वाढत चालली आहे. अरुंद रस्त्यांमुळे वाहनांची कोंडी होत आहे. याचा परिणाम म्हणून आठवडे बाजारादिवशीच खर्डा चौकात तब्बल दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. या सततच्या समस्येला प्रवासी वैतागले आहेत.

शहरातून नगर-बीड, शिर्डी-हैदराबाद महामार्ग जात असल्याने शिर्डी, तुळजापूर येथे जाणाऱ्या वाहनाच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे महत्वाच्या असलेल्या खर्डा चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यातच शनिवारी आठवडी बाजार होता. यावेळी अयोग्य नियोजनामुळे ट्राफिक जॅम झाले होते. शेवटी शहरातील काही नागरिकांनी जॅम झालेल्या वाहतुकीस मार्ग मोकळा करून देण्याचा प्रयत्न केला.

या वेळी नगर, बीड व खर्डा रोडवर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. शनिवारी आठवडी बाजार असल्याने बाजारात आलेल्या नागरिकांची या वहातूक कोंडीमुळे चांगलीच दमछाक झाली. मध्यंतरी नगरपरिषद, तहसील, पोलिस स्टेशन, बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतुकीला अडथळा होत असलेल्या अनेक दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले. मात्र, अतिक्रमणे काढूनही वाहतुकीचा अडथळा दूर होणार नाही. यासाठी या विक्रेत्यांना पर्यायी जागा देऊन किंवा त्यांची जागा निश्‍चित करून त्यांना विक्रीसाठी बसवावे, तरच हा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटणार आहे. सातत्याने होणाऱ्या वाहनांच्या कोंडीकडे संबंधित यंत्रणेने गांभीर्याने भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी लक्ष द्यावे. त्याचबरोबर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करावेत. रस्त्याकडेला व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईसारखी ठोस कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.