Breaking News

उन्हाच्या तडाख्याबरोबरच भाज्यांचे दर देखील कडाडलेअहमदनगर : नगर जिल्ह्यात दुष्काळा बरोबरच उन्हाचा तडाखा देखील वाढत असतांना आता पाण्याच्या अभावी बाजारपेठेत भाज्यांची आवक चांगलीच कमी झाल्याने भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले असून मागील आठवड्यात किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात जवळपास 30 ते 35 टक्के इतकी वाढ झाली आहे.
नगर शहराच्या आसपास च्या ग्रामीण भागातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला विक्री साठी अहमदनगर च्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आणत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात पाण्याची टंचाई वाढू लागल्याने पिण्यासाठीच प्रशासनाकडून पाण्याचे टँकर मोठ्या प्रमाणावर सुरू केले जात आहेत. त्यामुळे पिण्यासाठी कसेबसे पाणी मिळत असले तरी भाजीपाला पिकविण्यासाठी शेतीला पाणी मिळणे आता अवघड होऊ लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतक-यांच्या भाजीपाला उत्पादनात देखील घट झाली आहे.बाजारात भाज्यांची आवक कमी झाली असल्याने भाज्यांच्या भावांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. सध्या किर कोळ बाजारात गवार 160 रूपये, भेंडी 80, टोमॅटो 40, काकडी 60, मिरची 80, वाल 80, भोपळा 60, कांदा 15 रूपये, बटाटे 20 रूपये, सिमला मिरची 60 रूपये, फ्लॉवर 40 रूपये, कोबी 35 रूपये प्रतिकिलो या दराने तर कोथिंबिर एक जुडी 20 रूपये, मेथी 1 जुडी 25 रूपये,पालक 1 जुडी 15 रूपये अशा दराना सध्या भाज्या विकल्या जात आहेत. दरम्यान एप्रिल व मे महिन्यात भाज्यांच्या दरात आणखी थोडी वाढ होण्याची शक्यता असूुन आता पावसाळा सुरू होई पर्यंत भाज्यांचे भाव असेच वाढलेले राहाणार असल्याने सर्वसामान्य लोकांना मात्र त्याचा फटका बसू लागला आहे.