Breaking News

शत्रुघ्न सिन्हांच्या ‘होम मिनिस्टर’ देणार केंद्रीय गृहमंत्र्यांना टक्कर


लखनऊः उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये यावेळच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याविरुद्ध शत्रुघ्न सिन्हा यांच्या ‘होम मिनिस्टर’ अशी लढत रंगणार आहे. सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला असून त्यांना समाजवादी पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसही त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

समाजवादी पक्षाच्या नेत्या डिंपल यादव यांच्या उपस्थितीत पूनम सिन्हा यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. पूनम या 18 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आतापर्यंत काँग्रेस आणि समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष अशा दोन्ही पक्षांकडे राजनाथ सिंह यांच्याविरोधात लढण्यासाठी कोणी उमेदवारच नव्हता. राजनाथ सिंह यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी द्यायची, हे ठरत नव्हते.

भाजपचे खासदार असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना बिहारमधील पाटणा साहिब येथून लोकसभेची उमेदवारीही जाहीर झाली आहे. त्यानंतर पूनम या लखनऊ येथून लोकसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू झाली होती. अखेरीस त्यांनी आज समाजवादी पक्षात प्रवेश केला. तसेच त्यांना उमेदवारीही जाहीर झाली.

लखनऊमध्ये भाजपला पराभूत करणे शक्य व्हावे, यासाठी काँग्रेसने या ठिकाणी उमेदवार देऊ नये, असे आवाहन समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते रविदास मेहरोत्रा यांनी केले आहे. काँग्रेसने तसे अगोदरच सूचित केले आहे. अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्यात चांगलेच सामंजस्य आहे. त्यातच शत्रुघ्न सिन्हा यांच्या कुटुंबीयांविरोधात काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता नव्हतीच.

शत्रुघ्न सिन्हा हे काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याने काँग्रेसकडून पूनम सिन्हा यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. लखनौमध्ये सुमारे तीन ते साडेतीन लाख कायस्थ मतदार आहेत. तसेच सुमारे सव्वा लाख सिंधी मतदार आहेत. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांना लखनौ येथून उमेदवारी देण्यात यावी, असा सल्ला सपाच्या काही नेत्यांनी दिला होता.







दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि लखनौचे विद्यमान खासदार राजनाथ सिंह यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राजनाथ सिंह हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. पूनम सिन्हा यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता राजनाथ सिंह म्हणाले की, ’’कुणीतरी विरोधात निवडणूक लढवलीच पाहिजे. हेच आपल्या लोकशाहीचे सौंदर्य आहे.’’