Breaking News

निळवंडे कालव्याचे काम पूर्ण करण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी


प्रतिनिधी/संगमनेर: लोकसभा निवडणुकीचे वारे एकीकडे जोरात वाहत असतांना दुसरीकडे निळवंडेचे पाणी पुन्हा एकदा पेटणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. निळवंडे धरणाच्या अकोले तालुक्यातील कालव्यांची कामे पुर्ण होत नसल्याने कालवा कृती समितीने थेट न्यायालयात धाव घेतल्यानंतर आता जलसंपदा विभागाने येत्या आठ-दहा दिवसात ही कामे सुरु करण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भातील पत्र देण्यात आले असून पोलिस अधीक्षकांकडून हा बंदोबस्त उपलब्ध करुन देण्याची मागणी जलसंपदा विभागाकडून करण्यात आली.

निळवंडे धरणाचे काम पुर्ण झाले असले तरी अद्याप कालव्यांची कामे अपुर्ण आहेत. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. अकोले तालुक्यात कालव्यांच्या कामाला स्थानिक लोकप्रतिनिधी वैभव पिचड यांच्यासह त्यांच्या समर्थकांचा विरोध असल्याने हे काम बंद पाडण्यात आले होते. त्यामुळे लाभक्षेत्रातील १८२ गावांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर न्यायालयाचे दरवाजे ठोठावले गेले. न्यायालयाने संबधितांना कामाची वस्तुस्थिती व काम थांबण्याची कारणे यासंबधीचा अहवाल मागविला होता. त्यावेळी जलसंपदा विभागाच्यावतीने न्यायालयात पोलिस बंदोबस्तात काम सुरु करण्याचे असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यात आले होते. त्यानंतर तातडीने संगमनेरच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी २७ मार्चला जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी यांना यासंबधीचे पत्र देत पोलिस बंदोबस्तात कामे सुरु करण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडून पोलिस संरक्षण उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे.

राजकीय दबावातून चालढकल

राज्याच्या जलसंपदा विभागाकडे मागील दहा महिन्यापासून सुमारे १५८ कोटींचा निधी शिल्लक असतांना अकोले तालुक्यात ० ते २८ कि.मी.चे काम चालू करण्यास उत्तर नगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या दबावातून चालढकल करीत होते. त्यामुळे प्रस्तावित लाभक्षेत्रातील नगर-नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावातील शेतकऱ्यांत मोठा असंतोष पसरला होता. या निधीतून केवळ अकोले तालुक्यातील शुन्य ते २८ कि.मी.तील खडकाळ भागातील कामे तातडीने करावे अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीने जलसंपदा विभागाकडे वारंवार केली आहे. त्यासाठी कृती समितीने वेळोवेळी आंदोलने केली आहे.

- नानासाहेब जवरे, समन्वयक ,निळवंडे कालवा कृती समिती