Breaking News

भाजप प्रदेशाध्यक्षाच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती


बंगळूरः लोकसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांच्या कामकाजावर निवडणूक आयोग करडी नजर ठेवून आहे. राजकीय नेत्यांवर कारवाई करण्याचा बडगाही आयोगाने उगारला आहे. त्यातच, आता बंगळूर येथील एका हेलिपॅडवर जाऊन निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने भाजप नेत्याच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती घेतली. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष येडीयुरप्पा यांच्या हेलिकॉप्टरवर ही धाड टाकण्यात आली आहे.

कर्नाटकातील शिवमोगा येथून बी.एस. येदियुरप्पा यांचे हेलिकॉप्टर हवेत झेपावणारच होते. तितक्यात निवडणूक आयोगाचे भरारी पथक तेथे हजर झाले. या पथकातील अधिकार्‍यांनी येदियुरप्पा यांच्या हेलिकॉप्टरमधील प्रत्येक सामानाची कसून तपासणी केली; मात्र त्यामध्ये काहीही सापडले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरमधून एक काळ्या रंगाची पेटी उतरवण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचा भंग केल्यास तात्काळ कारवाई करण्यात येत आहे.

बाराबंकी येथील रेल्वे प्रशासनावरही आयोगाने मोदींचे फोटो तिकीटावर छापल्याप्रकरणी कारवाई केली. काही दिवसांपूर्वीच कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या गाड्यांचा ताफाही निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी तपासणीसाठी थांबवला होता. तत्पूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सल्लागार आणि स्वीय सहाय्य्कांसोबतच नातेवाईकांच्या घरी छापेमारी करण्यात आली होती. आक्षेपार्ह टीकेवरून सत्ताधारी भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांसह सप, बसपच्या नेत्यांवरही काही काळासाठी प्रचारबंदीची कारवाई आयोगाने केली आहे. निवडणूक आयोगाच्या या कारवाईची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. याचबरोबर निवडणूक आयोगाला त्यांची ताकद पुन्हा गवसल्याचा चिमटाही सरन्यायाधीशांनी काढला आहे.