Breaking News

कॉंक्रिटीकरणानंतर जुना कोयना पुलावरुन दुचाकी वाहतूक सुरू


कराड/ प्रतिनिधी : गेल्या वर्षभरापासून संपूर्ण कराडसह तालुक्यातील नागरिकांच्या प्रतिक्षेत असणारा येथील जुन्या कोयना पुलावरील कॉंक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून सोमवार, दि. 15 एप्रिलपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. पहिल्या टप्प्यात पादचारी व दुचाकी यांचीच वाहतूक पुलावरून सुरू राहिल, असे बांधकाम विभागातून सांगण्यात आले. 
 
पुलाचे काम रेंगाळल्याने महामार्गाच्या पलीकडील वारुंजी, गोटे, मुंढे, खोडशी येथील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते. यानंतर कामाला गती आली होती. पुलावरील लोखंडी पट्‌ट्या बसविण्याचे काम पूर्ण करून त्यावर कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यावर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली डांबरीकरणाचे काम सुरू आहे.

पुलाच्या दोन्ही बाजुकडील लोखंडी ग्रीलचे काम सध्या सुरू आहे. पुलाच्या पूर्व व पश्र्चिम बाजुकडील जोड रस्त्याचेही काम पूर्णत्वास गेले आहे. त्याचे डांबरीकरणही करण्यात आले आहे. महामार्गालगत असणार्या गावांना कराड शहरात येताना अडचणी येत आहेत. महामार्गावरून रस्ता ओलांडून धोकादायक पध्दतीने शालेय विद्यार्थ्यांना शहरात यावे लागत असल्याने पालक धास्तावले आहेत. जुन्या कोयना पुलाचे काम लवकर मार्गी लागावे अशी मागणी पालक वर्गाची आहे. याची दखल घेवून बांधकाम विभागाने जुन्या कोयना पुलावरील वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला असून सोमवार दि. 15 एप्रिलपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

पादचारी व दुचाकींची वाहतूक या मार्गावरून होईल. काम पूर्ण झाल्यानंतर अन्य वाहनांसाठी हा पूल खुला होईल, असे बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.