Breaking News

सोमवारी उमेदवारी माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणारसातारा / प्रतिनिधी : सातारा लोकसभेसाठी रणांगण पेटू लागले आहे. सोमवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने किती उमेदवार रिंगणात हे स्पष्ट होणार आहे. मात्र, महाआघाडीचे श्री. छ. उदयनराजे भोसले व महायुतीचे नरेंद्र पाटील यांच्यात काटे की टक्कर होणार आहे. त्या अनुषंगाने सभांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रचार कमी करण्यासाठी फक्त 15 दिवसांचा कालावधी शिल्लक असून सभांचे नियोजन आतापासूनच केले जात आहे.
सातार्‍यात राष्ट्रवादीचे आव्हान मोडीत काढण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर उदयनराजेंच्या हॅट्रीकसाठी राष्ट्रवादी सरसावली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. असे असले तरी जनतेवर छाप पाडण्यासाठी सांगता सभा ही महत्वाची असते. त्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी कार्यकर्ते गुंतले असून विविध परवाने व मैदाने निश्चितीसाठी धावपळ सुरू झाली आहे.
उदयनराजेंच्या प्रचाराची सांगता सभा दि. 20 रोजी सायंकाळी सातार्‍यात होण्याची शक्यता असून त्या सभेला राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची हजेरी असणार आहे. तर नरेंद्र पाटील यांच्या प्रचाराची सांगता सभा दि. 21 रोजी सकाळी 10 वाजता सातारा तालिम संघाच्या मैदानावर होणार असल्याने दोन्ही उमेदवारांकडून भरगच्च नियोजन सुरू आहे.
कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्यासाठी स्टार प्रचारकरांच्या सभांचे आयोजन करण्यामध्ये व त्यांच्या तारखा मिळवण्यामध्ये दोन्ही बाजूकडून प्रयत्न सुरु आहेत. नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी जिह्यात दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन सभा देवू केल्या आहेत. त्यांच्या सभा कोरेगाव आणि वाई येथे होणार आहेत. त्यांच्यासोबत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हेही आर्वजून उपस्थित राहणार आहेत.
तर ना. महादेव जानकर, ना. चंद्रकांत पाटील, केंद्रीय समाजकल्याण मंत्री यांच्याही सभा होणार आहेत. सभेच्या तारखा अजूनही निश्चित झाल्या नसल्या तरीही सांगता सभेची तारीख महायुतीची अंतिम झाली आहे. सांगता सभा या दोन ठिकाणी होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या मैदानावर दि. 21 रोजी सकाळी 9 वाजता तर दुपारी 2 वाजता कराड येथे होणार आहे.
दोन्हीही सभांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा होेणार आहे. महायुतीच्या सर्व सभांचे नियोजन करण्यामध्ये भाजपाची कोअर टीम व्यस्त आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनही उदयनराजे यांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारकांना आणण्याची जोरदार तयारी सुरु आहे. दि. 20 रोजी सायंकाळी किंवा दि. 21 रोजी दुपारी सभा होण्याची शक्यता होणार आहेत. यावेळी पक्षाध्यक्ष खा. शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या राज्यात 9 सभा होणार असून त्यातील एक सभा सातारा मतदारसंघात होणार आहे. त्यांची सभा पाटणला होण्याची शक्यता असून यासाठी सत्यजित पाटणकर यांचा पाठपुरावा सुरू आहे. यासाठी कराड दक्षिण आणि कराड उत्तरचेही कार्यकर्ते हजेरी लावण्याचे नियोजन करण्यात आलेे आहे.
धनंजय मुंडे यांच्याही सभेचे नियोजन सुरु असल्याच्या हालचाली राष्ट्रवादी भवनात सुरु होत्या.