Breaking News

युध्दात जिंकलेला राष्ट्रवादी तहात हरल्याची आशंका...!


नाशिक/ प्रतिनिधी: सत्ताधार्याच्या विरोधात सतत दोन वर्ष संघर्ष युध्द करून जिंकण्याच्या निर्णायक क्षणी तह करून सपशेल हाराकीरी पत्कारण्याची नामुष्की पक्षासाठी खपणार्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर आली आहे,नाशिक जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असतांना ऐन उमेदीच्या काळात भुजातील बळ दाखवण्यासाठी जागलेल्या खुमखुमीला गेली तीनचार वर्ष जीवाचे रान करून पक्षाला संजीवनी देणारा कार्यकर्ता हतबल करून पक्ष नेतृत्वाला नेमकं काय साधायचं आहे?याचे उत्तर शोधणार्या कार्यकर्त्यांची आकलनशक्ती दुबळी होऊ लागली आहे.

विशेषतः दिंडोरी मतदार संघात भावकीतील असुयेला चिथावणी देऊन कुणाच्या तरी महत्वाकांक्षेला गोंजारण्यासाठी पक्षनेतृत्वाने दाखवलेला अहंकार,जातीय वादाला कुमक पुरवून मराठा समाजाच्या मतांची विभागणी करीत अनुकूल वातावरण तयार केलेल्या नाशिक लोकसभा मतदार संघातही घडाळाचे काटे उलटे फिरविण्यास निमित्त ठरू शकतो.अशी कार्यकत्यांची भावना बनली आहे.

पाच वर्षात सत्ताधारी युतीच्या थापेबाज कारभारामुळे नाशिक जिल्ह्यातील सामान्य जनमत हळूहळू सत्ताधार्यांच्या विरोधात बनू लागले होते.शेतकर्यांच्या कर्जमाफीपासून जिल्हा बँकेच्या अवसायानात काढण्याच्या प्रक्रीयेपर्यंत,शेतीमालाच्या भावापासून वन जमिनीहक्कासह आदिवासींच्या मुलभूत प्रश्नांपर्यंत हा जिल्हा समृध्दी मार्गावर धावणार्या फडणवीसी वातानुकूलीत वाहनाच्या वेगाने झालेल्या आंदोलनातून विरोधकांनी सत्ताधार्यांविरूध्द जनमत तयार करण्यात यश मिळविले होते.या जनमताला प्रत्यक्षात कृतीत उतरविण्यासाठी विखूरलेल्या विरोधकांची मोट बांधण्याची कल्पकता वापरणे आवश्यक होते.अशा प्रकारची मोट बांधली जावी हीच जनइच्छा होती आणि आहे.यामागे अनेक कारणे आहेत.

या जिल्ह्याचे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबीत आहेत.जलसधन असलेला हा जिल्हा कृषी क्षेञातही प्रगतीपथावर आहे,तरीही शासनदरबारी या जिल्ह्याला नेहमीच दुय्यम स्थान मिळत गेले.जिल्ह्याला सत्तेतही शरद पवार सरकारचा अपवाद वगळता विशेष प्रतिनिधीत्व मिळाले नाही. शरद जोशी असो नाहीतर शरद पवार या जिल्ह्याने नेहमीच शरद युगाला साथ दिली आहे.१९९५ व २०१४ चा अपवाद सोडला तर युतीला या जिल्ह्याने फारसा वाव दिला नाही.एकूणच या जिल्ह्याची राजकीय मानसिकता पुरोगामी विचारसरणीकडे झुकणारी आहे.अशा अनुकूल परिस्थितीतही फाजील आत्मविश्वास आत्मघाताकडे घेऊन जातो हा धडा वारंवार मिळूनही विरोधकांचे नेतृत्व सुधारणा करायला तयार नाही.

या जिल्ह्याला पाणीदार बाणेदार नेतृत्व नाही अशी ओरड कायम होते.माञ ते नेतृत्व तयार व्हावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत किंबहूना तयार होत असलेल्या नेतृत्वाचे पंख राजकीय जाणिवेतून मुद्दामहून छाटले गेले.आणि या पापाला सर्वस्वी जबाबदार राष्ट्रवादीच आहेत.राजकारणातील ऐतिहासीक परंपरा सांगणारा राष्ट्रीय प्रवाह तर कधीच डबक्यात जमा झाला आहे.स्वतःच्या घराचे भाडेही जमा करण्याइतपत पत या प्रवाहाने राखली नाही.असो मुळ मुद्दा वेगळा आहे.

पाणीदार नेतृत्वाची भ्रूण हत्या करणार्या या जिल्ह्याला दत्तक पिता आणावा लागला.पालकही आयात करावा लागला.मग जनतेला सावञ वागणूक मिळाली तर दोष सत्ताधार्यांना का द्यायचा?
सुबह का भुला श्याम घर लौट आये तो उसे भुला नही कहते ही जाणीवही या मंडळींना होत नाही इतक्या या मंडळींच्या संवेदना ठार मेल्यात.म्हणूनच यंदा हाता तोंडाशी आलेला घास कुणीतरी हिसकावून नेताना पाहून निष्ठा जपणारे कार्यकर्ते हवालदिल तर होणारच ना?

पाणी प्रश्नावर आजवर नगर मराठवाड्याने दादागीरी केली आता गुजरात हात धुवून पाठीमागे लागल्याची आवई उठली आहे.या आवईनेही रान पेटवून सत्ताधार्यांच्या तंबूत आग लावण्याचे काम बर्यापैकी केले होते.तथापी इथेही पुन्हा दारिद्ररेषेच्याही खाली गेलेल्या राजकीय महत्वाकांक्षेने डाव साधला आणि दृष्टीपथात असलेल्या विजयाचे मुसळ उमेदवारी वाटपाच्या केरात घालवले.

खरेतर यंदा नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदार संघात काँग्रेस राष्ट्रवादीच्या मिञपक्ष आघाडीला विजयाची नामी संधी चालून आली होती.माञ पक्षावर आणि त्यातून जिल्हाभर आपलीच मक्तेदारी प्रस्थापीत व्हायला हवी या अट्टाहासातून पक्षाला ,निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि एकूणच संभाव्य विजयाला वेठीस धरल्याची भावना कार्यकर्ते उघडपणे बोलून दाखवू लागले आहेत.दिंडोरीत तर केवळ आपल्या बगलबच्च्यांच्या भावकीचे उट्टे काढण्यासाठी पक्षनिष्ठेवरच सुड उगविला की काय? अशी कार्यकर्त्यांची भावना झाली आहे.

पन्नास वर्षाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रीय असलेल्या जाणत्या नेत्याला इलेक्टीव्ह मेरीट कळत नाही असे म्हणणे दहा शतकातील अत्यंत दरिद्री जोक ठरेल.तरीही मतदानाचा दिवस जवळ येत असताना कार्यकर्त्यांना निवडणूक शब्दाचीच भिती वाटावी याचे कारण शोधण्यासाठी कुठले प्रमेय वापरायचे?
आज भाजपाच्या गोटात जाऊन विजयाचा दावा करणारे उमेदवार किंवा भाजपाशी काडीमोड घेऊन स्वतंञ तंबू ठोकत प्रस्थापितांना आव्हान देणारे तिसरा पर्याय ठरलेले उमेदवार जाणत्यांच्या नजरेतून सहजासहजी सुटू शकतात इतके साठीबाज राजकीय वय नक्की झाले नसावे.मग माशी कुठे शिंकली? पक्ष वाढवायचा आहे की नेस्तनाबूत करायचा आहे? हे प्रश्न प्रचाराला निघतांना कार्यकर्त्यांसमोर दत्त म्हणून उभे आहेत.

दिंडोरी मतदार संघात विजयाचे गणित पक्षासाठी सोपे होते.फक्त हे गणित मांडतांना बगलबच्यांची भावकी महत्वाकांक्षा आणि अहंकार बाजूला सारणे आवश्यक होते.दुसर्या बाजूला सुरगाणा पेठ कळवण दिंडोरी भागातील लाखभर आदिवासी मतांवर हक्क सांगणार्या डाव्या विचारसरणीला विश्वासात घेणे आवश्यक होते.त्याचा फायदा महाराष्ट्रातील इतर मतदार संघातील डाव्या मतांची बिदागी मिळविण्यातही झाला असता. याशिवाय पर्यायी उमेदवार देतांना इलेक्टीव्ह मेरीटसोबत कार्यकर्त्यांना सांभाळण्याची कुवत असलेला उमेदवार देण्याची जाण तरी ठेवायला हवी होती.नेमक्या याच्या उलटमार्गाने उमेदवारी प्रक्रीया राबविली गेली आणि उमेदवार नाही म्हणत असतानाही निवडणूकीच्या बोहल्यावर चढविला गेला,तोही आयात करून.आपले निर्यात करून आयात केलेल्यांना संधी देण्याचे हे पाप साखर कांदा आयात धोरणा इतकेच घातक ठरू शकते.हे सांगण्यासाठी कार्यकर्त्यांच्या चेहर्यावरील भावच पुरेसे आहेत.

उमेदवाराची राजकीय पार्श्वभूमी सकस आहे.वारसा जनहिताला पुरक आहे.सहानूभूतीही आहे.माञ निवडणूक जिंकण्यासाठी एव्हढे भांडवल पुरेसे नसते याची जाणीव असल्यामुळेच निवडणूक पेलण्याईतपत आर्थिक कुवत नाही,निवडणूकीचा खर्च पेलवू शकत नाही अशी स्पष्ट कल्पना उमेदवाराने पक्षश्रेष्ठींना दिली होती असे जिल्हा पातळीवर काम करणारे प्रथम दर्जाचे दुय्यम फळीतील नेते सांगतात.तरीही हाच उमेदवार देतांना पक्ष आणि निवडून आणण्याची जबाबदारी घेतलेल्या जिल्ह्याच्या पक्ष कारभार्यांनी उमेदवारीची माळ गळ्यात घातली याचा अर्थ निवडणूक खर्चाचा भार पक्ष आणि कारभारी उचलणार असे उमेदवारांसह कार्यकर्त्यांनाही वाटणे स्वाभाविक होते.प्रत्यक्षात कार्यकर्त्यांना विसंगतीला सामोरे जावे लागत आहे.तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रचाराची धुरा वाहणार्या तालुकाध्यक्षांना वाहनाची व्यवास्था करण्यातही कंजूषी दाखविली जात आहे.प्रचाराचे साहित्य वाहून न्यायचे कसे? हा मुलभूत प्रश्न प्रचार कार्यातील अडसर ठरत आहे.मुलभूत गोष्टीवर खर्च केला जात नाही तिथे हौशे गवशे नवशे कार्यकार्त्यांची हौस पुरविणे प्रचारप्रमुखांसाठी हिमालय सर करण्याइतके अवघड झाले आहे.एरवी पक्षनिष्ठेची सत्व परिक्षा पाहणार्यांनी जाणतेपणाने उमेदवार दिला असता विरोधी मतांची गोळाबेरीज करण्याच्या दृष्टीने डाव्यांना विधानसभेतील एखाद्या जागेचा त्याग करून सोबत घेतले असते तर २३ मे ला लाखांपासून पुढे मतांची मोजणी सुरू झाली असती,या कार्यकर्त्यांच्या व्यक्त होत असलेल्या भावना उद्याचे चिञ स्पष्ट करीत आहेत.

दिंडोरीप्रमाणेच नाशिकमध्येही जाणीवपुर्वक केलेल्या खेळी उलटण्याची भिती कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.पुन्हा एकदा वर्चस्ववादाच्या लढाईतून दिंडोरी मतदार संघाशी संबंधीत असलेल्या नेत्यांना शहरात हस्तक्षेप करू दिला जात नाही.वास्तविक नाशिक शहरावर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा विशेषतः बागलाणसह आदिवासी भागाचा वरचष्मा आहे.या भागातील नेत्यांचे शहर परिसरात असलेले नातेगोते नाशिक लोकसभा मतदार संघातील विजयाचे समिकरण बदलू शकते हा पुर्वानुभवही दुर्लक्षित केला जात आहे.यापेक्षाही भयानक चुका पक्षनेतृत्वाकडून वारंवार केल्या गेल्या आहेत.

नाशिक लोकसभा मतदार संघातून थोरल्या साहेबांनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची रास्त भावना होती.या भावनेला मुठमाती देण्यात कुणाला स्वारस्य होते याचा उलगडा कार्यकर्त्यांना अजूनही होत नाही.याशिवाय प्रतिस्पर्धी छावणीतील उणिवांना आपल्या फायद्यात कसे परावर्तीत करता येईल याचाही सकारात्मक विचार शक्य असूनही केला नाही.खरे तर दिंडोरीत सत्ताधार्यांनी वार करण्यासाठी जे अस्र वापरले किंवा वापरण्यासाठी इकडूनच आयती संधी दिली गेली तेच अस्र नाशिक लोकसभा मतदार संघात आयते हातात मिळत होते.ती संधीही जाणीवपुर्वक लाथाडली.नेहमी विचारात घेतले जाणारे इलेक्टीव्ह मेरीट पहाता या संधीत ते पुरेपूर भरलेले होते.माञ या सकारात्मक विचाराचे राजकारण न करता एकाच समाजाचे दोन उमेदवार समोरासमोर उभे कसे राहतील आणि त्या कलेक्टीव्ह वोट बँकेला छेद कसा देता येईल,समाज फोडून ,विखरून त्यात आपल्या मतांचे पिक कसे घेता येईल या विखारी,संकूचितआणि नकारात्मक विचाराने व्युहरचना करून निवडणूकीची रणनिती आखली ,अंमलात आणली गेली.त्याचा फटका नेत्यांना कितपत बसेल याचा निर्णय निकालानंतर लागेल पण कार्यकर्ते माञ आजच भरडले जात आहेत.

सुशिक्षित आणि सिमारेषेवर असलेल्या लाखो मतांना उपलब्ध झालेला तिसरा पर्याय या निवडणूकीच्या निकालाचे भविष्य बदलू शकतो.विद्यमान कारभारी कदाचीत समाज फोडून विजयाचे शिल्पकार होतीलही पण कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेल्या पराभवाच्या भितीने दोन्ही मतदार संघातील प्रचारयंञणेचे मनोबल खच्ची होत आहे,पक्षाची ही निती कुठे घेऊन जाणार हा प्रश्न कार्यकर्त्यांना हवालदिल करीत आहे.यावर जाणत्यांकडे कुठला उपचार आहे?एकूणच युध्दात जिंकलेली राष्ट्रवादी तहात हरल्याची रूखरूख कार्यकर्ते बोलून दाखवू लागल्याने जिल्ह्यात तळागाळात रूजलेले पाळेमुळे उखडून काढण्यासाठी विरोधकांना कुठला स्ट्राईक करण्याची गरज उरली नाही.