Breaking News

लोकसभेच्या सातारा मतदारसंघात गावोगावी प्रचाराचा धुरळा


लोकसभेच्या सातारा मतदारसंघात गावोगावी प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. उमेदवारांसह नेत्यांची भाषणबाजीची चढोओढ सुरु आहे. मतदारांना खुश करण्याच्या नादात आपण काय बोलतोय...बरळतोय याचे बोलणार्‍याला भान नसलं तरी ते ऐकणार्‍यांना मात्र जितकं गंमतीदार आणि तितकंच चीड आणणारं वाटत आहे. उमेदवार व नेत्यांची भाषणबाजी ऐकल्यानंतर रात्री उशिरापर्यंत गावागावातील पारांवर राजकारण्यांच्या ढोंगीपणाची कीव करणार्‍या चर्चा झडू लागल्या आहेत. उमेदवारांची भूमिका पटली नसताना सुध्दा त्याबाबत सोशल मिडियावर कारवाईच्या भितीपोटी कुणी पोष्ट टाकण्याचे धाडस करताना दिसत नाही. परंतु, गटागटात, एकमेकांशी बोलताना उघडपणे मते व्यक्त केली जात आहेत. राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले व शिवसेना-भाजप व मित्रपक्षाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात प्रमुख लढत होत आहे. त्यामुळे इतर उमेदवारांपेक्षा या दोघांमध्ये होत असलेल्या लढतीबाबतच मते आणि प्रतिक्रिया अधिक ठळकपणे व्यक्त होताना दिसत आहेत. दोन ते अडीच महिन्यांपुर्वी जानेवारीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विकासकामांच्या उद्घाटन व भुमीपुजन सोहळ्यासाठी सातार्‍यात आले होते. भाजपच्या या कार्यक्रमात व्यासपीठावर उदयनराजे विराजमान पाहून खरंतरं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. प्रोटोकॉल म्हणून खासदारांना तिथे निमंत्रित केलं असेल असू म्हणून उपस्थितांनी हा विषय तिथेच सोडून दिला. परंतु, उदयनराजेंनी याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रातील सरकारचा अक्षरश तोंडभरुन कौतुक केले. सर्वत्र वेगाने विकासकामे होत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांची ही भूमिका आता दोन महिन्यांनंतर राष्ट्रवादीकडून उमेदवारी करताना दिसणं शक्य नाही. त्यामुळे त्यांना भाजप सरकारच्या विरोधात पोटतिडकीने बोलावं लागत आहे. त्यांची ही बदलती भुमिका पाहून मतदारांना आश्चर्य वाटत असून हा निव्वळ ढोंगीपणा असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अशा प्रकारच्या भाषणबाजीमुळे जनतेची करमणूक होत आहे.
दुसरीकडे शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार तथा माथाडी नेते नरेंद्र पाटील हे पहिल्यांदाच खासदारकीची निवडणूक लढवित आहेत. भाजपप्रणित सरकारने केलेल्या विकासकामांबरोबरच विद्यमान खासदारांनी काय केलं यासंदर्भात विचार मांडत आहेत. त्यांचं काम पाहिलं नसल्याने त्यांच्यावर कमी बोललं जात आहे किंवा टिका-टिप्पणी अभावानेच ऐकायला मिळत आहे. परंतु, उदयनराजेंच्याबाबत मात्र उलट-सुलट प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.